छत्रपती संभाजीनगर : भारतीय जनता पार्टीकडून एकीकडे वस्तू व सेवाकरात कपात केल्याचे ढोल-ताशे, नगारे वाजवून स्वागत केले जात असले तरी कपडा व्यापाऱ्यांमध्ये कमालीचा नाराजीचा सूर ऐकण्यास येत आहे. काही व्यावसायिक १८ टक्के वस्तू व सेवाकरासह कपड्यांची विक्री करण्याच्या तयारीत आहेत. आम्ही आमच्या खिशातून कर का भरावा, असा त्यांचा प्रश्न आहे.
सर्वसामान्य खरेदीदारांना अद्याप कुठल्या प्रकारच्या कपड्यांमध्ये ५ टक्के आणि कुठल्यामध्ये १८ टक्के वस्तू व सेवाकर आहे, याची माहिती नाही. साधारणपणे सोफासेटची आवरणे, रजई, उंची टाॅवेल, गालिचे आदींच्या खरेदीवर यापूर्वी १२ टक्के वस्तू व सेवाकर होता. आता तो १८ टक्के झाला आहे, तर बेडशीट, चादरी, साधे टाॅवेल यांच्या किमतीवर पाच टक्के वस्तू व सेवाकर झाला असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
इतर कपड्यांची खरेदी अडीच हजारांवर गेली की त्यावर १८ टक्के वस्तू व सेवाकर आकारूनच तर अडीच हजारांखालील खरेदीवर पाच टक्के आकारूनच देयक केले जाईल. एका कुटुंबातील सदस्यांचे एकूण खरेदीचे देयक अडीच हजारांवरच जाते. त्यातच चाणाक्ष ग्राहकांच्याच वस्तू व सेवाकरातील ५ टक्के आणि १८ टक्क्यांच्या खरेदीतील फरक लक्षात येण्यासारखा असून, सर्वसामान्य खरेदीदारांमध्ये संभ्रम राहणार असल्याचे चित्र आहे. महानगरांमध्ये अनेक कपडा व्यावसायिक वस्तू व सेवाकरासह देयके अदा करण्याची चिन्हे असली तरी तालुका, ग्रामीण भागात मात्र, किमतीतच कर समाविष्ट करून विक्री होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
वस्तू व सेवाकर कमी केल्याच्या निर्णयाचा कपडा खरेदीच्या व्यवसायात फारसा फरक पडणार नाही. कारण काही कपड्यांच्या किमतीत १२ टक्क्यांवरून ५ टक्के कमी झालेले असले तरी काही सोफासेट, गालिचा आदींच्या खरेदीवर आता १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वस्तू व सेवाकर लागणार आहे. यात दुकानदारांचे अधिक नुकसान आहे. – अजय मंत्री, उपाध्यक्ष, कापड व्यावसायिक असोसिएशन.