छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही घेतलेले निर्णय कागदावर राहिलेले नाहीत. गेल्या काही दिवसात सात प्रकल्पाची घळभरणी हाेऊन सिंचन क्षमता वाढली आहे. कृष्णा खोऱ्यातील पाणी आता लवकरच पोहचेल. त्याच बरोबर सांगली पुरात वाहून जाणारे पाणीही मराठवाड्यात आणले जाईल. उल्हास नदीचे ५४ अब्ज घनफूट पाणी दिले जाईल. पश्चिम नद्यांचे पाणी आणण्यासाठी डिसेंबरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होतील आणि त्यानंतर जानेवारी – फेब्रुवारीपर्यंत निविदा प्रसिद्ध होतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहणानंतर ते बोलत होते.

दोन वर्षापूर्वी घेतलेल्या बैठकीचा सर्व लेखाजोखा मांडता येईल. या बैठकीत वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर, तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर यांना निधी दिला असून औंढा येथील मंदिराचा विकास आराखडा पूर्ण करण्यात आला आहे. मानव विकास मीशन अंतर्गत ९४ बस देण्यात आले असून ९१६ अंगणवाड्याही बांधून तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हायब्रीड अन्युटीमधून ७११५ कोटींची रस्त्याची काम सुरू असून एक लाख १४ हजार सिंचन विहिरी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आम्ही घेतलेली मराठवाड्यातील बैठक केवळ औपचारिकता नव्हती, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

केवळ एवढे नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पाणी पुरवठा योजनेस निधी देण्यात आला असून महापालिकेचा ८०० कोटी रुपयांचा स्वहिस्सा भरण्याचा प्रश्नही आता सुटला आहे. समृद्धी महामार्गामुळे अन्य राज्यातील गुंतवणूकही वाढत असून संभाजीनगर हे शहर आता इव्ही वाहन उत्पादनचे प्रमुख केंद्र बनले आहे. लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीचे काम आता पूर्ण हाेत असून त्यात १४ हजार जणांना नोकऱ्या मिळतील. त्याच बरोबर अहिल्यानगर ते बीड असे रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आम्ही मराठवाड्याच्या विकासासाठी काम करत राहू, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.