औरंगाबाद :  औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून कार्यकर्त्यांनी गळ घातली ती कल्याण काळेंना. डॉ. काळे यांचे प्रेम अब्दुल सत्तारांवर. त्यामुळे या उमेदवारीसाठी तेच कसे योग्य असे कल्याण काळे यांनी सांगितले. या दोन प्रमुख नावांसह १२ उमेदवारांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे पक्षनिरीक्षकांना कळवले. त्यांनीही १४ नावे पुढे पाठवली आणि वर ठरावही केला, ‘प्रदेश काँग्रेसला मान्य असेल, तो उमेदवार आम्हालाही मान्य असेल.’

शहरातील गांधी भवन येथे काँग्रेस उमेदवारांच्या मुलाखती निरीक्षक भीमराव डोंगरे यांच्या समक्ष घेण्यात आल्या. या वेळी कार्यकर्त्यांनी डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी दिली जावी, अशी मागणी जोरदारपणे केली. पण काळेंनी उमेदवारीचा चेंडू स्वीकारण्यास आमदार अब्दुल सत्तार कसे योग्य आहेत, हे सांगितले. गेल्या वेळी निवडणुकीच्या रिंगणात असणारे नितीन पाटील यांनी या वेळी अर्ज केलेला नाही. इतर दहा इच्छुकांमध्ये नामदेव पवार, रवींद्र बनसोड, मिलिंद पाटील, किरण पाटील डोणगावकर, मोहन देशमुख, इब्राहिम पठाण, पृथ्वीराज पवार, युसूफ मुकाती, अरुण दापकेकर यांनी उमेदवारी घेण्यास इच्छुक असल्याचे प्रदेशाला कळवले खरे, पण कोणीतरी यावे आणि उमेदवारी घ्यावी, असाच एकूण नूर होता.

काँग्रेस पक्षात यापुढे उमेदवारीमध्ये युवकांना स्थान दिले जाईल, असे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी नेहमी सांगतात. आज उमेदवारीस इच्छुक असणाऱ्यांचे वय किमान ४३ वर्षे आणि कमाल ६९ वर्ष असल्याची यादी प्रदेशाला पाठविण्यात आली. अब्दुल सत्तार आणि कल्याण काळे यांचे वय सारखे आहे. ते ५५ वर्षांचे आहेत. काँग्रेस शहराध्यक्ष नामदेवराव पवार हे ६५ वर्षांचे आहेत. मोहन देशमुख, पृथ्वीराज पवार यांचे वय अनुक्रमे ६२ आणि ६९ एवढे आहे. मात्र, पाठविण्यात आलेल्या यादीत सुशिक्षित उमेदवारांची संख्या अधिक आहे. डॉ. कल्याण काळे बीएचएमएस ही पदवी मिळविली आहे.

अब्दुल सत्तारांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. नामदेवराव अभियंता आहेत. अन्यही अनेक उमेदवार पदव्युत्तर आहेत. यादीत कोण किती शिकले आहे आणि कोणत्या जातीचे आहेत, याचे उल्लेखही करण्यात आलेले आहेत. यादीतील प्रमुख उमेदवार माझ्याऐवजी तुम्हीच उभे राहा, याच मानसिकतेत असल्याचे कार्यकर्त्यांना दिसून आले.