देशी मद्यविक्रीत पाच टक्के, विदेशीत नऊ टक्क्य़ांची वाढ

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद</strong>

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात तळीरामांनी बीअर आणि वाईनऐवजी विदेशी मद्य पिण्यावर भर दिला असल्याची आकडेवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून समोर आली आहे.

मराठवाडय़ातील परभणी जिल्ह्य़ात मद्यावरील नियंत्रणावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष होते. एकटय़ा परभणी जिल्ह्य़ात बीअर, वाईन आणि देशी मद्यविक्रीत घट झाली असल्याची आकडेवारी आहे, तर बीडमध्ये नेहमीप्रमाणे तळीरामांनी सारी हौस भागवून घेतल्याचे स्पष्ट होत आहे. मराठवाडय़ात देशी दारूच्या विक्रीत ५.२ टक्के, विदेशी दारूच्या विक्रीत ९.८ टक्के वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. तर बीअर आणि वाईन यावर निवडणुकीदरम्यान ‘आचारसंहिता’ होती. त्याची टक्केवारी उणे तीन ते उणे १७ टक्के एवढी आहे.

निवडणुकीच्या कालखंडामध्ये विक्री झालेले विदेशी मद्य १४ लाख १२५ लिटर एवढे होते. २१ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीतील ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या म्हणजे २०१८-१९च्या तेवढय़ाच कालावधीसाठी विचारात घेतली तर विदेशी मद्याच्या विक्रीत ९.१ टक्क्य़ांची वाढ झाली. तर देशी मद्यात ही वाढ केवळ ५.२ टक्के एवढीच झाली. परभणीसारख्या जिल्ह्य़ात देशी मद्याची विक्री ५.६ टक्क्य़ांनी घटली. असे का घडले असावे, याबाबतची माहिती घेतली असता सांगण्यात आले की, मद्य परवाना असल्याशिवाय देशी मद्य जरी विकले तरी कारवाई होईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी आवर्जून कळविले होते. तो संदेश गावागावांत पोहोचविण्यात आला होता. त्यामुळे परभणी जिल्ह्य़ात बीअर, देशी आणि वाईन या तीनही मद्यप्रकारात घट दिसून आली, तर विदेशी मद्याच्या विक्रीतही औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणी या तीन जिल्ह्य़ांमध्ये फारशी वाढ दिसून आली नाही. तुलनेने विदेशी मद्याच्या विक्रीत हिंगोली जिल्ह्य़ात लक्षणीय वाढ दिसून येते. ते प्रमाण ३७.९ टक्क्य़ांनी वाढले होते. मुळात हिंगोली जिल्ह्य़ात मद्यविक्रीचे परवाने कमी होते, ते वाढल्यामुळे ही टक्केवारी अधिक असू शकते, असे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी सांगतात.

कारवाई.. : निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात देशी-विदेशी आणि मद्यनिर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनांचा साठा जप्त करण्याची ११५६ प्रकरणे दाखल करण्यात आली. ८७१ प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदल्यानंतर ८७७ जणांना अटक करण्यात आली. मात्र, निवडणुकीत परराज्यातून मद्य विक्रीस आणल्याच्या घटना बीड जिल्ह्य़ात सर्वाधिक होत्या.

जिल्हा        विदेशी मद्य    देशी मद्य

औरंगाबाद       ४.८          २

बीड                ११.७         ४.६

हिंगोली           ३७.९         ४.५

जालना           ११.३         ८.५

लातूर              १२.४         २.३

नांदेड               ९            १५.८

उस्मानाबाद     ४.८          ६.२

परभणी            ५.५          -५.६

मद्य विक्रीत झालेली वाढ आणि घट दाखविणारी टक्केवारी