औरंगाबाद : राज्यातील काही सहकारी दूध उत्पादक संघांनी गायीच्या दुधामागे प्रतिलिटर २ दोन रुपयांनी दर घटवले असून मराठवाडय़ातील उत्पादकांमध्ये अस्वस्थता निर्माण पसरली आहे. पशुधनाच्या चाऱ्यासह खाद्याचेही दर यापूर्वीच वाढलेले आहेत. त्यामुळे दुधातील नफा आटला असून त्यात आता दरही सहकारी संस्थांकडून २५ रुपये लिटरऐवजी २३ रुपयांनी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दर घटवले आहेत की नाही, याची माहिती १० तारखेच्या हिशोबाच्या नोंद वहीतून कळणार असल्याचे उत्पादक सांगत आहेत.  पश्चिम महाराष्ट्रातील काही सहकारी दूध संघांनी गायीच्या दुधाचे दर २ रुपयांनी कमी केले आहेत. त्यांच्या निर्णयाची री खासगी दूध संकलन संस्थाही ओढत असल्याने ऐन दिवाळीत दुधाची चांगली मागणी असताना विक्री केलेल्या दुधाला कमी दर मिळण्याची शक्यता वर्तवून शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. खासगी दूध संकलन केंद्रांकडून सध्या गायीच्या दुधाला २७ रुपये तर सहकारी दूध संघांकडून २५ रुपये प्रतिलिटरचा दर मिळतो.

दूध उत्पादक शेतकरी विश्वंभर हाके यांनी सांगितले की, आडगाव या आपल्या गावातून दररोज ४ हजार लिटर दुधाचे संकलन होते. यातील काही दूध हे शासकीय दूध संघाला तर काही खासगी संस्थांना पुरवले जाते. सध्याच चाऱ्याची एक पेंडी १५ रुपयांना मिळते आहे. एका गायीला दिवसभरात ८ ते १० पेंडय़ा लागतात. सरकीच्या खल्लीबाटाचा दर तीन हजार ६०० रुपये क्विंटलचा दर आहे. दिवसभरात एका गायीला ४ किलो खल्लीबाटा लागतो. एक गाय १० लिटर दूध देते. अशा गायीची किंमत ५० हजार रुपये आहे. दूध विकून शेतक ऱ्याच्या हाती काहीच येत नाही.

दूध संघाने अद्यापपर्यंत गायीचे दूध दर घटवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील अन्य भागातील काही संस्थांनी दूध दर घटवल्याचे ऐकण्यात आलेले आहे. मात्र, दूध वाढवणे किंवा कमी करण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर तो विषय संचालकांच्या बैठकीत मांडावा लागतो. तूर्त तरी दर कमी करण्याचा विचार नाही. 

– नंदकुमार काळे,  उपाध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ.