औरंगाबाद – विद्यार्थिनींच्या छेडछाडीस मज्जाव केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने शाळेच्या मुख्याध्यापकासह अधीक्षकावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना कन्नडजवळील मकरणपूर भागात शुक्रवारी घडली. मजीद जमील शेख (वय २४, रा. मकरणपूर), असे हल्लेखोराचे नाव आहे. तर ए. पी. चव्हाण व संतोष जाधव अशी अनुक्रमे जखमी मुख्याध्यापक व अधीक्षकांची नावे आहेत.
कन्नड कारखाना परिसरात जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालय असून दहावीपर्यंत वर्ग भरणारी ही शाळा आहे. या शाळेतील मुलींची मजीद जमिल शेख हा मागील वर्षांपासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर मोटार सायकल घेऊन मुलींची छेड काढायचा. याबाबत मुख्याध्यापक ए.पी.चव्हाण यांनी मागील वर्षांपूर्वी समजावून सांगितले होते. त्यानंतरही छेडछाड सुरूच होती. त्यामुळे मुख्याध्यापक श्री.चव्हाण यांनी त्यास समजावून सांगून मज्जाव केला. मात्र शुक्रवारी शाळा सुटण्याच्यावेळी मजीद याने शाळेच्या प्रवेशद्वारासमोर जाऊन मुख्याध्यापक चव्हाण यांना त्याची त्याच्या वडिलांकडे शाळेसमोर चक्कर मारत असल्याच्या पाठवलेल्या छायाचित्राचा जाब विचारून वाद घातला. शाळेचे अधीक्षक संतोष जाधव यांच्याशीही वाद घालून शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी मुख्याध्यापक चव्हाण व अधीक्षक जाधव हे मजीदच्या वडिलांना समजून सांगण्यासाठी जात असताना मकरणपूर त्याने मुख्याध्यापक व अधीक्षकांना रस्त्यात अडवून दोघांवर तलवार हल्ला केला. संतोष जाधव यांच्या डाव्या खांद्यावर वार केले तर मुझ्याध्यापकांच्या उजव्या खांद्यावर वार केले. हल्ल्यात दोघेही जखमी झाले. घटनेची माहिती कळताच सहा.पो.नि.दिनेश जाधव यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहचले. जखमींना उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलविले. या प्रकरणी मुख्याध्यापक ए.पी.चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी मजीद जमिल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक शिक्षक संघटनांचे सर्व पदाधिकारी यांनी आरोपीस तात्काळ अटक करावी, जो पर्यंत आरोपीस अटक होत नाही तो पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येतील असा इशारा दिला.
यावेळी शहर पोलीस ठाण्यात तालुक्यातील सर्व व्यवस्थापणेच्या शाळांचे शिक्षक,मुख्याध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.