छत्रपती संभाजीनगर : एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय बदलताना कीड आणि पीक काढणीनंतर पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाई देण्याची तरतूद वगळली असल्याचे सांगण्यात येत आहे. विमा कंपन्या धार्जिणा निर्णय घेत असल्याने या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त होत आहे. राज्य सरकारने पीक विम्यातील बदलांबाबतचा शासन निर्णय बुधवारी जारी केल्यानंतर त्यातील उणिवांवर आता बोट ठेवले जात आहे.
पीक विम्यात गैरमार्गाने लाभ मिळविण्यासाठी सरकारने दिलेल्या विविध सहा प्रकारच्या सुविधांचा लाभ घेतला जात असे. या सुविधांच्या आडून होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी आता केवळ उंबरठा उत्पादन हाच निकष ठरविण्यात आला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्य सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सहा बाबी अंतर्भूत केल्या होत्या. केंद्राच्या याेजनेत या बाबी पूर्वी नव्हत्या. यामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी व लावणी न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीमध्ये पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक आपत्ती, गारपीट, भुस्खलन या मुळे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान या सहा बाबी वगळण्यात आले आहे. यामुळे काढणीनंतर पाऊस आला आणि नुकसान झाले तरी विमा मिळत असे. आता ही बाब वगळण्यात आली आहे.
पीक विम्याबाबतच्या राज्य सरकारने पूर्वी अतिरिक्त केलेल्या सहा बाबी आता वगळण्यात आले असून, केवळ उंबरठा उत्पादनच हाच निकष आता लागू होणार आहे.डॉ. प्रकाश देशमुख, अधीक्षक, कृषी