औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेला असतानाच दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलून पूर्वीचेच देवगिरी करण्याची प्रक्रिया पुढील मराठवाडा मुक्तिदिनापर्यंत पूर्ण केली जाईल, अशी घोषणा पर्यटन व कौशल्य विकासमंत्री मंगलप्रसाद लोढा यांनी येथे केली.

औरंगाबाद येथे कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यादवांच्या काळात त्यांची राजधानी असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे होते. पुढे मुस्लीम सत्तांनी या किल्ल्यावर ताबा मिळवल्यावर त्याचे नामकरण दौलताबाद असे केले. जे पुढे कागदोपत्री कायम राहिले. या किल्ल्याला पूर्वीचेच असलेले देवगिरी हे नाव पुन्हा दिले जाईल तसेच त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पुढील मराठवाडा मुक्तिदिनापर्यंत पूर्ण केली जाईल, अशी घोषणा लोढा यांनी येथे केली.

 अमृत महोत्सव वर्षांनिमित्त वर्षभरात पाच लाख लोकांना रोजगार देण्याचा सरकारने संकल्प केला. त्याची सुरुवात औरंगाबादमधून करतो आहोत. अधिकाधिक जणांना रोजगार मिळावा यासाठी आमचे प्रयत्न असतील. नोकरी किंवा स्वयंरोजगाराबाबत विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे लोढा म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकारकडून उभारले जाणारे कौशल्य विकास विद्यापीठ औरंगाबाद येथे सुरू करण्याची मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या वेळी केली. कार्यक्रमाला आमदार हरीभाऊ बागडे, प्रशांत बंब, विभागाच्या प्रधान सचिव मनीषा शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी केंद्रीय मंत्री डॉ. कराड म्हणाले, केंद्रस्तरावर किमान कौशल्याचे वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत. केंद्र सरकार किमान कौशल्य विकास विद्यापीठ करत आहे.