लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : जमिनीचा अकृषिक परवाना काढून देण्यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये घेताना एका खासगी व्यक्तीला पकडण्यात आले असून त्याने बीडमधील सहायक नगररचनाकारासाठी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात सहायक नगररचनाकार प्रशांत शिवाजी डोंगरे (वय २९), व्यवसाय अभियंता नीलेश सोपान पवार व खासगी व्यक्ती तथा अभियंता शेख नेहाल शेख अब्दुल गणी (वय ३०) हे तिघे अडकले असून त्यांच्याविरुद्ध बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होती.

आणखी वाचा-छत्रपती संभाजीनगर : लाखांचे तीन लाख करुन देणारा भोंदूबाबा पकडला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यातील तक्रारदाराचे यळंबघाट शिवारात गट क्रमांक ५८० अ (१) मधील २०.५० आर क्षेत्राचा अकृषिक परवाना काढायचा होता. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज बीपीएमएस पोर्टलवर नीलेश पवार याच्यामार्फत नोंदणी केली. यासंदर्भातील प्रस्ताव बीडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठवून पुढील कार्यवाहीसाठी नगररचना कार्यालयात पोहोचल्यानंतर नीलेश पवार याने सहायक तथा प्रभारी नगररचनाकार प्रशांत डोंगरे याच्यासाठी ३० हजारांची मागणी २ एप्रिल २०२४ रोजी केली. यामध्ये १५ हजारांची तडजोड करून ती रक्कम बुधवारी शेख नेहाल याच्याकडे देण्यास सांगितले. पंचासमक्ष शेख रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांनी लावलेल्या सापळ्यात अडकला. शेख नेहालसह नीलेश पवार या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.