गोपीनाथगडाचे दर्शन घेऊन दुसरी राजकीय इिनग सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी थेट गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथ मुंडे समाधीचे दर्शन घेत दुसऱ्या ‘राजकीय इिनग’ची सुरुवात केली.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी पुतणे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपल्या स्वतंत्र राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी मुंडे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले व मुंडे यांची मुलगी पंकजा मंत्री, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते झाले. कौटुंबिक कलहानंतर कट्टर राजकीय विरोधक बनलेल्या बहीण-भावाला एकाच वेळी राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळाली. दीड वर्षांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय कामाला श्री क्षेत्र भगवानगडावर जाऊन सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळी गडावर त्यांना दगडफेकीचा सामना करावा लागला होता, तर मंत्री पंकजा मुंडे यांनी मागील वर्षभरातच दिवंगत मुंडे यांच्या स्मरणार्थ परळीजवळील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात गोपीनाथगडाची निर्मिती केली. पंकजा मुंडेंचे राजकीय शक्तिस्थळ म्हणून हा गड ओळखला जातो. या पाश्र्वभूमीवर विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. दिवंगत मुंडे यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीच्या दिवशीच ३ जून रोजी धनंजय यांची निवड झाली. यानंतर थेट परळीत आलेल्या धनंजय यांनी गोपीनाथगडावर जाऊन मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या नव्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. दिवंगत मुंडे यांच्या संघर्षांचा वारसा आपणच चालवत असल्याचा दावाही धनंजय यांनी केला.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde started his second inning
First published on: 08-06-2016 at 01:57 IST