छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘एमआरआय’ आणि ‘ सिटी स्कॅन’ या दोन्ही सुविधांच्या शुल्कात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. शासकीय रुग्णालयात किमान दोन हजार रुपये तर कमाल चार हजार रुपये शुल्क आकारले जात होते. तर सिटी स्कॅनसाठी किमान ३५० ते ७०० रुपयांर्यंत शुल्क लागत असे. गेल्या वर्षभरात १०४५४ एमआरआय आणि ३९ हजार सिटी स्कॅन काढण्यात आले होते. साधारणत: ६ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद यासाठी लागणार होती. मात्र, त्यातील अर्धी रक्कम आता जिल्हा नियोजन समितीतून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून तसेच बुलढाणा, जळगाव येथून उपचारांसाठी रुग्ण येतात. या रुग्णांवर उपचार करताना सिटी स्कॅन व एमआयआय या दोन्ही सुविधा वापरणाऱ्यास मोठी शुल्कवाढ करण्यात आली होती, ते कमी करण्याची मागणी वारंवार केली जात होती. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या नियोजन समितीच्या बैठकीत शुल्कवाढ ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुक्रे म्हणाले, ‘रुग्णांना या योजनेला लाभ होईल. शुल्काची प्रतिपूर्ती जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणार आहे. त्यास मान्यता मिळाली असून, शासनाकडून या प्रक्रियेला मान्यता देण्यात आल्यानंतर येत्या आठ दिवसांत शुल्क ५० टक्केच आकारले जाईल.’ या निर्णयामुळे तीन ते साडेतीन कोटी रुपयांचा निधी मिळू शकेल, असे सांगण्यात आले.
बैठकीतील अन्य निर्णय
स्मशानभूमी शेड पोच रस्ता तसेच संरक्षण भिती उभारण्यासाठी एक कोटी रुपये
वीज अटकाव यंत्रे घेण्यासाठी एक कोटी रुपये
शासकीय कार्यालयावर सौर वीज प्रकल्प बसविण्यासाठी १५ कोटी रुपये
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी २५ कोटी रुपये
‘‘घाटी रुग्णालयात बाहेरून औषधे आणवी लागू नयेत म्हणून विशेष अभियान हाती घेतले. त्याला यश आले. मात्र, वाढीव शुल्क अनेकांना परवडत नसल्याने यामध्ये मार्ग काढण्याची विनंती करण्यात आली होती. त्यास मंजुरी देण्यात आल्याने त्याचा लाभ गरीब रुग्णास होईल. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता