छत्रपती संभाजीनगर : संत-महंतांनी तेलाअभावी पाण्याच्याच आधारे पणत्या पेटवून दीपावलीच्या सणोत्सवात प्रकाशाने आसमंत उजळून टाकल्याच्या आख्यायिका आपण ऐकत आलेलो आहोत. परंतु, आजच्या मानवनिर्मित तंत्रस्नेही युगात चक्क पाणी टाकताच पणत्या पेटत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरणच समोर असून, या पाणी टाकताच चेतणाऱ्या पणत्या पाहून त्यांच्या खरेदीला पसंती मिळत असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे.
पाण्याने पेटणाऱ्या पणत्यांमध्ये संवेदकांचा (सेन्सर) वापर करण्यात आलेला आहे. या संवेदकाच्या आधारानेच पणती पाणी टाकताच चेतते. पणतीचे हे चेतणे हा विजेच्या दिव्याप्रमाणे आहे, पण भास मात्र दीपकसारखा आहे. एका पणतीची किंमत २५ ते ३० रुपये असून, डझनाच्या प्रमाणात विक्रीची पद्धत सुरू आहे. त्यातही लहान-मध्यम-मोठ्या आकाराच्या पणत्या आहेत.
बाजारात पणत्यांचेच दोन डझन केवळ प्रकार आहेत. अकरा आणि एकवीस संख्येतील पणत्यांना एकाच तबक स्वरुपात तयार करण्यात आलेले प्रकारही बाजारात पाहायला मिळत आहेत. आकर्षक, रंग-रंगोटी केलेल्या या पणत्यांचे तबक दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत आहे. डिजिटल पणत्याही असून, गोल आकारातील सेलवरील या पणत्या एका बटणावरून सुरू होणाऱ्या आहेत.
खापराच्या पणत्यांनाही आकर्षक कलाकुसरीच्या आधारे तयार करण्यात आलेले आहे. खापराची पणती म्हणजे खाली पडताच फुटणार, हा समजही गैर ठरणारा असून, खापराच्याच पण मजबूत पणत्या पाहायला मिळतात. मेणबत्त्यांना ठेवण्याचे सोनेरी स्टॅण्डही बाजारात उपलब्ध असून, प्रकाशाच्या या सणासाठी नाना प्रकार उपलब्ध असल्याने ग्राहकांना नावीन्यतेची खरेदी करता येत असल्याचे येथील व्यावसायिक बाबूमियाँ बलूनवाले यांनी सांगितले.
आकाश कंदिलांमध्ये पुन्हा एकदा चीनमधील उत्पादित मालाचीच खरेदी होत आहे. चीनी बनावटीचे आकाश कंदील बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, त्यांची गोलाकार ओळख कायम लक्षात येण्यासारखी आहे. दुकानदारांकडूनही काही चिनी उत्पादित मालाची ओळख पूर्वीसारखी लपवून ठेवली जात नाही. यंदा झोतपुरी कुर्ता-पायजमा प्रकारातील कपड्यांचा वापर केलेले झोत आकाश कंदिलांमध्येही बाजारात दाखल झालेले आहेत. सोनेरी रंगाच्या पट्ट्यांना झोत कपड्यांनी जोडून त्यावर आकर्षक नक्षीकाम केलेले हे आकाश कंदील असून, ३०० रुपयांपासून ५ हजारांपर्यंत त्याची किमत असल्याचे पाहायला मिळते.
प्लास्टिक फुलांच्या माळांची रस्त्यापासून ते मोठमोठ्या माॅलमधूनही विक्री होताना दिसते आहे. पिवळे, शेंदरी, पांढऱ्या रंगातील प्लास्टिकच्या झेंडूंच्या माळा शहरातील प्रमुख मार्गावर पावलो-पावली दिसत असून, रांगोळीच्या मध्यभागी कमळासह अन्य फुलांचा गुच्छा दिसेल, असाही एक उत्पादित माल बाजारपेठेत दिसून येत आहे. त्याला महिला वर्गाकडून विशेष मागणी होत असून, घर-अंगणासमोरील रांगोळीची हा प्लास्टिक फुलांचा गुच्छा अधिक शोभा वाढवणारा दिसतो आहे.
दिवाळसणाला आठवडाही उरलेला नसून, मागील चार दिवसांपासून खरेदीला जाणाऱ्या ग्राहकांमुळे शहरातील रस्ते गर्दीने फुलून जात आहेत. जालना मार्गासह त्याला समांतर रस्त्यांवरही गर्दीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याचे चित्र शहरामध्ये सध्या दिसून येत आहे.