छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शहर आणि नजीकच्या नऊ परीक्षा केंद्रांना शुक्रवारी कुलगुरू डाॅ. विजय फुलारी यांनी ‘अकस्मात’ भेटी दिल्या. यामध्ये पाथ्री (ता. फुलंब्री) येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या दोन कक्षांमध्ये ‘सामूहिक काॅपी’चा प्रकार आढळून आल्याने त्या सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेशही कुलगुरूंनी दिले आहेत.
विद्यापीठाच्या पव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा २९ एप्रिल, तर सहा मेपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. शहरातील व्ही. एन. पाटील व एम. पी. लॉ कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, राजेश टोपे फार्मसी, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, वाय. बी. चव्हाण फार्मसी महाविद्यालय अशा सात ठिकाणी भेट दिली. तर या ठिकाणी बारा कॉपीबहाद्दर आढळून आले. तर सकाळच्या सत्रातील भेटीत पाथ्री येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या दोन कक्षामध्ये ‘सामूहिक काॅपी’ (मास कॉपी) आढळून आली. या प्रकारानंतर मात्र, कुलगुरूंनी येथील सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेशही परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांना दिले आहेत. या ठिकाणी दोन पोते नकला सापडल्या, तर खामगाव येथील गोरक्ष फार्मसी महाविद्यालयातही पाच कॉपी बहाद्दरांना पकडले. त्यांचाही संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले. या वेळी भरारी पथकातील डॉ. सतीश दांडगे व डॉ. सचिन भुसारी हेही उपस्थित होते.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रावर विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे व्यवस्था करण्यात आल्याचे आढळले नाही. याबद्दल कुलगुरूंनी संबंधित केंद्रप्रमुखाला विचारणा केली. तसेच पर्यवेक्षकांची खरडपट्टी केली. या संदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. बी. एन. डोळे यांना विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्याची सूचनाही कुलगुरू यांनी केली आहे.
कुलगुरू डॉ. फुलारी यांनी पदव्युत्तर परीक्षेत २९ एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी बीड शहरातील तीन परीक्षा केंद्रांना अचानक भेट दिली. या ठिकाणी ३६ कॉपीबहाद्दर आढळले असून, त्यांचाही ‘संपूर्ण परफॉर्मन्स रद्द’ (डब्ल्यूपीसी) करण्याचे आदेश दिले होते. चार जिल्ह्यांतील केंद्रांवर विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या परीक्षा केंद्रावर कुलगुरूंनी अकस्मात भेटी देऊन छत्तीस कॉपीबहाद्दर पकडले. तसेच परीक्षा केंद्रातील त्रुटी संदर्भात कारवाई कारण्याचे आदेश दिले. यानंतर दुसऱ्या टप्प्यात एम.ए, एम.कॉम, एम.एस्सी, बी.एड, बीपीएड आदी सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू झाल्या.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे (एनईपी-२०२३) या परीक्षा घेण्यात येत आहेत. यासाठी चार जिल्ह्यांत मिळून ३२ परीक्षा केंद्रे आहेत. तर ३२ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. पदव्युत्तर परीक्षा सुरू झाल्यावर तिन्ही आठवड्यांत सुमारे पन्नास केंद्रांना कुलगुरू यांनी भेट दिली, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.