छत्रपती संभाजीनगर – सीमोल्लंघनाच्या वेळी आणि गळा भेट घेताना आपट्यांच्या पानांची लयलूट करण्याची साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला अर्थात विजयादशमीला परंपरा चालत आलेली आहे. पण ही परंपरा “न पाळणारे” एक गाव आहे. पर्यावरण संवर्धनवादी या गावाचे नाव आहे बहुली!
सिल्लोडच्या उत्तर दिशेला आणि शहरापासून व अजिंठा लेणीपासून १८ किलोमीटर अंतरावरील बहुली गावात मागील एक तपापासून (१२ वर्षे) कुऱ्हाडबंदी आहे. आपट्यासह कुठलेच झाड तोडले जात नाही. गावची लोकसंख्या बाराशे असून, साडे आठशे मतदान आहे. सिल्लोडचे डॉक्टर तथा पर्यावरणस्नेही, मानव व वन्यजीव संघर्ष समितीचे सदस्य डॉ. संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून बहुली गावात पर्यावरण संवर्धन, कुऱ्हाडबंदी आदी उपक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती गावचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब निकोत यांनी सांगितले.
बारा वर्षांपासून कुऱ्हाडबंदी
बहुली गावात कुऱ्हाड बंदी आहे. पर्यावरण संवर्धन केले जाते. गावात आपट्याची २०० पेक्षा अधिक झाडे आहेत. आपट्यासह कुठलेही झाड तोडले जात नाही. उलट सीमोल्लंघन केल्यानंतर गळाभेट घेताना ग्रामस्थ ज्वारी, बाजरीची पाने वाटप करतात. – भाऊसाहेब निकोत, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.पं. सदस्य.
औषधी गुणधर्मामुळे “सोने”
आपटा हे सृप प्रजातीतील झाड आहे. म्हणजे झुडूप प्रजातीतील. त्याची उंची सात-आठ फुटाच्या उंचीपर्यंत वाढणारी असते. आपट्याचे झाड हे पर्यावरणीय दृष्ट्या औषधीधर्मीय असल्यानेच त्याच्यातील “सोन्या”सारखे महत्त्व ओळखले जाते. आयुर्वेदात त्याला अश्मंतक म्हणतात. गुणधर्म कफनाशक आहे. मूतखडाही विरघळवतो. पाने कृमिघ्न – जंतूनाशक असतात. मुळव्याधीवरही आपटा गुणकारी आहे.
आपट्याच्या कवळ्या पानांची भाजी केली जाते. दसऱ्याला काही जण पानांची विक्री करण्यासाठी निष्ठूरपणे त्याची तोड करतात. म्हणून त्याचे जतन करण्याचा विचार बहुली ग्रामस्थांपुढे मांडला आणि त्यांनी प्राणपणाने जपला आहे. आपट्याची झाडं आणि पानं न तोडणारे बहुली हे आगळे-वेगळे गाव आहे. – डॉ. संतोष पाटील, सिल्लोड.
आपटा व कांचनवृक्ष कसा ओळखाल
आपटा आणि कांचनवृक्ष यातील फरक फारसा लक्षात न येणारा आहे. कांचनवृक्षाची पाने आणि आपट्याची व्दिपत्री असतात. पण आकारमानात बराच फरक आहे. कांचनवृक्षाची पाने मोठी असतात तर आपट्याची पाने नाण्याच्या आकाराची असतात. ती फांदीला तशी दाट संख्येनेही असतात. कवळ्या पानांची भाजीही रुचकर होते !