छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसीत सुरू असलेल्या अवैध काॅल सेंटरच्या माहिती संदर्भाने महाराष्ट्र पाेलिसांना अमेरिकेतून ई-मेल पाठवण्यात आला हाेता. या ई-मेलमध्ये किती लोकांची फसवणूक झाली आहे, याची प्राथमिक माहिती नमूद असून, या संदर्भातील तपशीलवार यादी अमेरिकेतूनच महाराष्ट्र पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे, असे निवेदन या प्रकरणाच्या तपास अधिकारी गीता बागवडे यांनी गुरुवारी न्यायालयात केले. दरम्यान, अवैध काॅल सेंटरचा मुख्य सूत्रधार अब्दुल फारूक मकदूम शहा (वय ४९, रा. खास गेट) याला बुधवारी सायंकाळी गाेव्यातून ताब्यात घेऊन शहरामध्ये आणण्यात आले. गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एच. देशमुख यांनी फारूकला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपास अधिकारी बागवडे यांनी न्यायालयात सांगितले, की हवाल्यामार्फत आलेल्या पैशांतून संपूर्ण कॉल सेंटरचा व्यवस्थापक आरोपी फारुकी करत होता. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची, आरोग्याची, तसेच जाण्या-येण्यासाठी लागणाऱ्या वाहनांची व्यवस्था तो पाहत होता. तसेच कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे हे आरोपी फारुकीचे प्रमुख काम होते. विशेष म्हणजे कॉल सेंटरचा भाडे करारनामाही फारुकीच्या नावे आहे.
मुख्य आरोपी जॉन हा सध्या आभासी ओळख यंत्रणेद्वारे (व्हर्च्युअल आयडी) संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. कॉल सेंटर चालविण्यासाठी आरोपीकडे रोख रक्कम येत होती, मात्र ती रक्कम कोठून आणि कोणाकडून येत होती, याचा तपास सुरू आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या ऐवजात आणखी भर पडली असून, सात चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली असून, १०३ लॅपटॉप आणि १४६ मोबाइल हँडसेट ताब्यात घेतले आहेत.
एकही तक्रार नाही, मात्र ई-मेल
आरोपीच्या वतीने ॲड. पद्मभूषण परतवाघ यांनी सांगितले, की २८ ऑक्टोबरपासून आजपर्यंत एकही व्यक्ती फसवणुकीची तक्रार घेऊन पोलिसांकडे गेलेली नाही. राज्यात वा देशात या कॉल सेंटरमधून एक रुपयाचीही फसवणूक झाल्याचे पुरावे नाहीत. लॅपटॉप आणि वाहने पोलिसांनी जप्त केली असली, तरी कोणताही तक्रारदार समोर आलेला नाही किंवा अमेरिकेतूनही कोणतीही पुष्टीकारक माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे गुन्ह्यातून फसवणूक किंवा आर्थिक व्यवहार सिद्ध होत नाहीत, म्हणून आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. त्यावर तपासी अधिकारी बागवडे यांनी यूएसमधून महाराष्ट्र पोलिसांना मेल प्राप्त झाल्याचे निवेदन न्यायालयाला केले.
