छत्रपती संभाजीनगर – साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याचा सण आणि आपट्याच्या झाडांची पाने असे एक समीकरणच जुळलेले आहे. किंबहुना दसऱ्याला सीमोल्लंघनानंतर सोने म्हणून आपट्याची पाने देऊन गळा भेट घेणे किंवा थोरांचे आशीर्वाद घेणे ही परंपराच रूढ झालेली आहे. आपट्यालाच आपण सोन्याचे स्थान-मान जसा दिला, तसेच काही फुलपाखरांसाठीही आपट्याचा वृक्षही अत्यंतिक महत्त्वाचा आहे, याची माहिती फारसी प्रचलित झाली नाही. त्यामागचे गमकही आपट्याचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.

ट्राय कलर पिड फ्लॅट, प्लेन राजह, ब्लॅक राजह व लेमन एमीग्रॅण्ट या चार प्रजातीतील फुलपाखरे ही केवळ आपट्याच्याच झाडावर अंडी घालतात. यातला विशेष भाग असा आहे की आपट्याच्या पानांच्या खालच्या बाजूला वरील फुलपाखरे अंडी घालतात. पुढे सुरवंट होतात आणि त्यातून फुलपाखरू पूर्णाकारात जन्म घेते, असे सिल्लोड येथील पर्यावरणस्नेही, मानव-वन्यजीव संघर्ष समिती सदस्य (सोयगाव) डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले.

डॉ. पाटील पुढे सांगतात, आपट्याचे झाड उंची सात-आठ फुटाच्या उंचीपर्यंत वाढणारे असते. शेंगवर्गीय हे झाड आहे. त्याची पाने व्दिपत्री असतात. एखाद्या पेटीचे झाकण झाकून ठेवल्यासारखे मुडपतात (शेप ऑफ लंग्ज) किंवा त्याची घडी बसते. झाडांची पाने ही आपल्या फुफ्फुसारखी (लंग्ज) असतात. ऑक्सिजनचे देवाण-घेवाण करण्याचे काम पानांच्याच माध्यमातून होत असते.

आपट्याचे झाड हे पर्यावरणीय दृष्ट्या औषधीधर्मीय असल्यानेच त्याच्यातील “सोन्या”सारखे महत्त्व ओळखले जाते. अशीच पाने कांचनवृक्षाचीही असतात. त्यावरही वरील फुलपाखरे अंडी घालतात. आपट्याच्या पानाला सूक्ष्म अशी लव असते. आणि फुलपाखरांच्याही पायाला एक रिसेप्टर म्हणजे संवेदक (सेन्सर) असते. त्या ओळखीने फुलपाखरू आपट्याची निवड करते.