छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंधित केलेला शब्द उच्चारून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अवमान केल्याचे सांगत सोमवारी शहरात मोर्चा काढण्यात आला. विविध आरोपांमुळे आर्थिक अनियमिततांची चर्चा चव्हाट्यावर येऊ लागल्याने जातीच्या आधारे मोर्चा आयोजित करण्यामागे मंत्री शिरसाट यांची ताकद असल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
मंत्री संजय शिरसाट यांचे पूत्र सिद्धांत व पत्नीच्या नावे सहजापूर भागात वर्ग दोन श्रेणीतील जमीन खरेदी करण्यात आली. या जमिनी खरेदीची वर्ग दोन श्रेणीची माहिती देताना खासदार जलील यांनी प्रतिबंधित शब्द वापरला होता. मात्र, या शब्दाचा उपयोग आपण मनाने केला नसून तो शासकीय दप्तरी महसूल प्रशासनाने वापलेला शब्द आहे. त्यामुळे तो वापरला. ज्या महसूल अधिकाऱ्यांनी हा शब्द शाासकीय दप्तरी कायम ठेवला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही विभागीय आयुक्तांकडे जलील यांनी केली होती. याच काळात जलील यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून जलील यांच्या विरोधातील मोर्चाचे फलक अनेक ठिकाणी लावण्यात आले. तसेच या मोर्चाला गर्दी व्हावी म्हणून खास प्रयत्न करण्यात आले. सोमवारी सकाळी या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. निळ्या रंगाचे झेंडे घेऊन सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली.
या मोर्चाच्या अनुषंगाने बोलताना जलील म्हणाले, ‘‘मूळ विषयाला म्हणजे आर्थिक घोटाळे बाहेर पडू लागल्याने त्याच्या चर्चेला वळण देण्यासाठी मंत्री संजय शिरसाट हेच सारे घडवून आणत आहेत. मोर्चासाठी अगदी बस लावून लोकांना बोलावण्यात आले. आपण अशाप्रकारे अजिबात विचलित होणार नाही. अजूनही अनेक प्रकरणांची माहिती आपल्याकडे आहे, ती प्रकरणेही उघडकीस आणू. आपण नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर केला आहे,’’ या मोर्चात सहभागी असणाऱ्यांनी माजी खासदार जलील यांनी जाणीवपूर्वक प्रतिबंधित शब्द वापरला असल्याचा आरोप केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मोर्चेकऱ्यांची मागणी होती.
मोर्चेकऱ्यांची मागणी
वारंवार जातिवाचक शब्द वापरून अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाचा अवमान करणारे माजी खासदार इम्तियाज जलील यांना ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक करावी.