जालना : शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. जवळपास चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिले जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. या पदावर ते जवळपास पंचवीस वर्षे होते.

१९९५ मध्ये ते अंबड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून निवडून आले होते. त्यानंतर १९९९ आणि २००४ मध्येही त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला. गेली निवडणूक त्यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढविली. परंतु, त्यांना यश आले नाही. या निवडणुकीनंतर ते तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेतच (उद्धव ठाकरे) आणि पक्षाच्या जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदावर असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात होते.

उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात चोथे यांनी आपण काही वैयक्तिक कारणांमुळे पक्षाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. ‘दिवंगत बाळासाहेब ठाकरे व आपले प्रेम गेली चाळीस वर्षे विविध पदांवर काम करताना लाभले. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जरी दिला असला तरी माझ्या हृदयात दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आपण, ‘मातोश्री’ बद्दल शेवटच्या श्वासापर्यंत प्रेमाची भावना राहील’ असे चोथे यांनी ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

जालना जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी दहा वर्षे, पाच वर्षे ‘महानंद’ चे संचालक, तीन वेळेस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक इत्यादी पदावर ते राहिलेले आहेत. शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयी वेगवेगळे अंदाज जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहेत.

शिवसेनेच्या (उबाठा) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या व्यतिरिक्त आपण सध्या कोणतेही राजकीय वक्तव्य करणार नाही.’ – शिवाजीराव चोथे, माजी आमदार