बिपीन देशपांडे

औरंगाबाद : २०१४ पासून डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या अखेरीस गारपिटीच्या तडाख्याचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या शेतकऱ्यांना यंदा दिलासा मिळाला आहे. सौरडाग (सौरडाग-सनस्पॉट) सक्रिय झाल्यानंतरच्या वातावरणीय बदलांचा हा परिणाम असून यंदासह पुढील दोन वर्षेही गारपीट होण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मागील सात-आठ वर्षांपासून डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान दरवर्षी गारपीट होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत गेले. रब्बी हंगामातील ऐन हाता-तोंडाशी आलेली पिके गारपिटीच्या तडाख्यात भुईसपाट होत होती. द्राक्षे, आंबे, टरबूज, डाळिंब, मोसंबी या फळबागांनाही फटका बसत असल्याने गारपिटीचा तसा शेतकरी व उत्पादकांना धसकाच होता. मात्र, यंदा आठ वर्षांनंतर डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातही गारपीट झाली नाही. यासंदर्भात येथील महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम विज्ञान व अंतराळ केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले,की यावर्षी उत्तर भारतात व उत्तर जगामध्ये थंडीचा खूप कडाका पडला होता. सूर्यावरती सौरसाखळी, त्यातही २५ क्रमांकांचा डाग सध्या सक्रिय झालेला आहे. सूर्यावर सौरडाग निर्माण होत असताना शून्यावरून सुरुवात होते आणि ती डागांची संख्या कमाल मर्यादा गाठते व परत कमी होते.

२०२० च्या डिसेंबरदरम्यान सौरडागांची साखळी सुरू झाली. २०२५ पर्यंत सौरडागांची कमाल मर्यादा गाठली जाईल, असा एक अंदाज बांधला गेला होता. त्यातही २०२१, २०२२ असा सालनिहाय अंदाजही होता. परंतु त्या अंदाजानुसार २०२४ सालचा जो सौरडागांचा अंदाज होता, त्यात बदल होऊन कमाल डागांची मर्यादा २०२३ सालीच गाठली. यातून एकंदर सूर्यावरील हालचालींचे अवलोकन केले असता खदखदणे वाढलेले आहे. त्याचा परिणाम पाहता उत्तर गोलार्ध थंड आहे. पण आपण राहतो त्या विषुववृत्तीय, समशीतोष्ण भागामध्ये सूर्याची जास्त उष्णता मिळते. प्रशांत महासागरातील विषुववृत्तावरील तापमानात बदल होऊन ला-निनो परिस्थिती बदलून अल-निनोसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या जवळपास अडीच वर्षांपासून ला-निनोची परिस्थिती कायम होती.

प्रशांत महासागराचे विषुववृत्तावरील तापमानाची ला-निनो परिस्थिती यंदा जैसे-थे राहील, असा पहिल्या सत्रात अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, बदललेल्या हवामानामुळे विषुववृत्तीय तापमानाच्या परिस्थितीमध्ये मे-जूनलाच अल-निनो येईल. त्याचा परिणाम असा असेल की यंदाचा पावसाळाही कमी असणार आहे आणि उष्णता वाढलेली असेल. मात्र मागील दोन-चार महिन्यांमधील अवलोकन केले असता सूर्यावर खूप खदखदणे वाढलेले असेल, असे संकेत मिळत आहेत. परिणामी पुढील दोन वर्षे गारपीट होणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम, एपीजे विज्ञान व अंतराळ केंद्र.