|| बिपीन देशपांडे

पैठण तालुक्यात प्रयोग

औरंगाबाद : हिवाळ्यातही तयार झालेले ढगाळ आणि पावसाळी वातावरण पाहून पिकांवर रोग, मावा पडण्याच्या परिस्थितीने शेतकरी चिंतित असून पैठण तालुक्यातील काही फळ-फुलशेती उत्पादकांनी मात्र, यावर स्वस्तातला तोडगा शोधून काढला आहे. महागलेल्या औषधांवर होणारा फवारणीचा खर्च निम्म्यावर आणला आहे. खर्चात बचत करणारा हा उपाय पिवळ्या आणि निळ्या चिकट सापळ्यांचा असून अत्यंत परवडणारा हा उपायमार्ग उत्पादकांनीही अवलंबण्याची गरज प्रयोगशील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अलीकडेच मराठवाड्यासह इतरही काही भागांत ऐन हिवाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले होते. शिवाय धुक्याची दुलईही दुपारपर्यंत पसरली जात होती. अशा वातावरणातून कापसासह हरभऱ्यासारख्या पिकांवर रोग पडतो. वांगे, टोमॅटो, मिरची या फळशेतीत मावा, रोग, अळीचा प्रादुर्भाव होतो. परिणामी पीक अडचणीत येते. यासाठी शेतकरी प्रति फवारणी २ हजार रुपये खर्च येणाऱ्या औषधांवर करतो. तरच रोगराईवर नियंत्रणात येते, असा शेतकऱ्यांचा समज झालेला आहे. त्यातून उत्पादित मालावरील खर्च वाढतो. त्यात बाजारात भाव कमी मिळाला तर चार आणे की कोंबडी बारा आणे का मसाला होतो. बाजारभावापेक्षा पिकांवर खर्चच अधिक होत असल्याचा अनुभव शेतकरी कायमच घेतात.

यातून काही शेतकऱ्यांनी चिकट सापळ्यांचा पर्याय काढला आहे. पैठण तालुक्यातील वडजी येथील फुल-फळशेती उत्पादक मनोज गोजरे यांनी सापळ्यांचा प्रयोग अत्यंत सफल ठरत असल्याचा दावा केला आहे. गोजरे यांच्याकडे ३० गुंठ्यात फुलशेती आहे. तर उर्वरित शेतीत १५०० झाडे र्डांळबाची आहेत. इतरही भाजीपालासारख्या शेतीचे प्रयोग त्यांचे सुरू असतात. अलीकडेच ढगाळ वातावरण, पाऊस येऊन गेल्यामुळे फुलशेतीसह फळशेतीही अडचणीत आली आहे. टोमॅटो, वांगी, हरभरा, मिरची आदी पिकांवर मावा, पतंग, कीड, अळ्यांचा प्रादुर्भाव होतो आहे. यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करतो आहे. मात्र यातील खर्च कमी करण्यासाठी गोजरे यांनी अवघे १२५ रुपयांना मिळणारे निळ्या व पिवळ्या रंगांचे सापळे खरेदी केले आहेत. या सापळ्यांना एका लाकडी काठीवर अडकवले जाते. त्यावर एखादा पक्षीही बसतो. हा पक्षी कीड, अळी, पांढरी माशी टिपत चालतो. शिवाय सापळ्याला मावा, रोगराईचे घटक येऊन चिकटतात. परिणामी महिन्यात किंवा १२० दिवसांत चार फवारणी करण्याऐवजी दोनच फवारणी करता येते. त्यातून दोन फवारणीच्या खर्चात बचत होते. सध्या शेतकऱ्यांना अशाच प्रयोगांची गरज असून केवळ स्वस्तात एखादा सापळा मिळतो म्हणून त्याच्या परिणामकारकतेवर संशय व्यक्त करू नये. त्यांना दुय्यम नजरेने पाहू नये. प्रत्यक्षात आपण केलेला प्रयोग सफल झाल्याचे सध्या दिसत आहे. खर्चातही बचत होत आहे. शेतकऱ्यांना निळ्या, पिवळ्या सापळ्यांना शेतात लावून फवारणीच्या खर्चात बचत करता येते, असे मनोज गोजरे यांनी सांगितले.

निळे, पिवळे चिकट सापळे ७५ टक्के कृषी केंद्रांवर मिळतात. अवघे सव्वाशे रुपये किमतीचे हे सापळे शेतात लावले तर पिकांचे कीड, मावा, अळी, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होण्यापासून संरक्षण होते आहे. आपला प्रयोग सफल ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याकडे वळावे, असे वाटते. केवळ स्वस्त मिळणारे हे सापळे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये. महागड्या औषधांपेक्षा सापळे लावल्याने फवारणीवर दुप्पट, तिप्पट होणाऱ्या खर्चात निश्चितच बचत होत आहे. दोन फवारणीमधील अंतर वाढलेले आहे.

– मनोज गोजरे, प्रयोगशील शेतकरी, वडजी.