गुलाब, निशिगंधाला २०० रुपये किलो तर झेंडूलाही चांगला दर

औरंगाबाद : अतिवृष्टीनंतर नुकसान झाल्यानंतर उत्पादित मालाला शुक्रवारी बाजारात दर काय मिळतो याची विवंचना लागून राहिलेल्या फुल उत्पादक शेतकऱ्याचा दसरा अखेर गोड झाला. झेंडूला गुरुवारी शंभर रुपये तर शुक्रवारी ठोक बाजारात  तीस ते चाळीस रुपये दर मिळाला. गुलाब, निशिगंध, शेवंतीलाही चांगला दर मिळाल्याने अतिवृष्टीनंतरच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे चेहरे काहीसे फुलले होते.

औरंगाबादच्या जाधववाडी उच्चतम कृषी बाजार समितीत दसऱ्याच्या  पार्श्वभूमीवर दोन दिवसात साधारण ५०० क्विंटल फुलांची आवक झाली. त्यामध्ये झेंडूसह गुलाब, शेवंती, जरबेरा, निशिगंधासह इतरही फुलांची आवक झालेली होती.

झेंडूला ठोक बाजारपेठेत गुरुवारी शंभर रुपये किलोचा दर मिळाला. तर शुक्रवारी दरामध्ये काहीशी घसरण झाली. झेंडूचा दर ३० ते ४० रुपयांपर्यंत खाली आला. तर गुलाबाला २०० ते २५० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. निशिगंधाला १५० ते २०० रुपये तर शेवंतीला १०० ते १२० रुपये किलोचा दर मिळाला. महालक्ष्मी सणाच्यावेळी निशिगंधाला ४०० रुपये किलो दर ठोक बाजारात मिळाला, असे वडजी येथील फुल उत्पादक शेतकरी मनोज गाजरे यांनी सांगितले.

जाधववाडी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वतंत्र फुलबाजार व्यापारी संकुल आहे. शहरातील सिटी चौक भागातही पहाटे फुलांचा बाजार भरतो. या बाजारात अहमदनगर, नांदेड, परतूर आदी भागातून फुलं घेऊन उत्पादक दाखल होतात. बाजार समितीतील फुल व्यापारी समाधान विखे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ४० ते ५० क्विंटलने फुलांची आवक झाली.

बाजार समितीत पाच ते सहा ठोक माल खरेदी करणारे व्यापारी असून शुक्रवारी दसऱ्यामुळे  २०० ते  २५० क्विंटल विविध फुलांची आवक झाली. ठोक बाजारात झेंडूला ५० रुपयांपर्यंतचा दर मिळाला.