छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ स्त्री रोग-प्रसूतिशास्त्र डॉक्टर सविता प्रभाकर पानट यांचे मंगळवारी पहाटे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या ८० वर्षाच्या होत्या. गेल्या आठवड्यात त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ‘साकार’ या अनाथ आणि निराधार बालकांचे दत्तक प्रक्रिया केंद्र चालविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे.
डॉ. सविता पानट यांचा शहरातील सामाजिक-शैक्षणिक-साहित्यिक चळवळीशी संबंध होता. त्या प्रागतिक विचारांसाठी ओळखल्या जात. आपल्याला सन्मानाने मृत्यू स्वीकारायचा असून आपल्या पश्चात कोणतेही धार्मिक विधी केले जाऊ नयेत या विषयी त्या आग्रहाने बोलत.शहर आणि राज्य पातळीवरील प्रसुतीशास्त्र डॉक्टराच्या संघटनेच्या त्या पदाधिकाऱ्या होत्या. शहरातील प्रसिद्ध अनंत विद्यामंदिर प्रशालेच्या आणि अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या त्या पदाधिकारी होत्या. ‘साकार’ या अनाथ बाळांचे दत्तक प्रक्रियेद्वारे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक सदस्य, आणि २५ वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. ‘साकार’ने आतापावेतो कायदेशीररित्या ४०० हून अधिक अनाथ, निराधार बाळांना दत्तक प्रक्रियेद्वारे हक्काचं घर, आई. वडील व मायेचे छत्र मिळवून दिले.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यलयातून पदवी आणि नागपूर मधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयांतून २० वर्षे अध्यापन केले.छत्रपती संभाजीनगर येथे विभागप्रमुख म्हणून ४ वर्षे तर पुण्याच्या बी. जे वैद्यकिय मध्ये १० वर्षे त्यांनी काम केले. स्त्रीरोग प्रसूतिशास्त्राचा एकूण ५५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या पानट यांचे अनेक विद्यार्थी राज्यभर पसरलेले आहेत. वंधत्व निवारण या विषयातही त्यांनी काम केले आहे. २५ जास्त राज्यस्तरीय, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांतून त्यांनी व्याख्याने दिली असून, विविध नियतकालिके , वर्तमानपत्रांतून स्त्रीआरोग्यावर त्यांनी लिखाण केले.स्त्री आरोग्यावर त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.