लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : नवाबाचे वंशज असल्याचे भासवून शहरात असलेली मोक्याची जमीन देण्याचे आमिष दाखवत डॉक्टर महिलेची तब्बल ८० लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात महिलेसह तिघांवर शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.

सिराज यारखान हसन यारखान, सय्यद तौखीर हैदर एस.के हुसेन, सय्यदा तसलीम फातिमा मीरलायक अली, अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आझाद महाविद्यालयासमोरील रोजाबागेतील रहिवासी डॉ. रुबिना नसिरुद्दीन सिद्दिकी यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार १० ऑगस्ट २०२१ पासून आरोपींची डॉक्टर रुबीना यांच्याशी ओळख आहे सय्यदा तसलीम फातिमा या नवाबाच्या वंशज असल्याचे सांगत त्यांनी रुबिना यांचा विश्‍वास संपादन केला. शहरात नवाबाची शेकडो हेक्टर जमीन आहे व ही जमीन आम्हाला परत मिळणार आहे. मात्र शासनाकडे पुरावा करावा लागणार आहे. त्यासाठी मोठा खर्च लागेल तो खर्च दिल्यास मिळालेल्या जमिनीतून तुम्हाला जमीन देऊ अथवा पैसे परत करू, असा विश्‍वास आरोपींनी रुबिना यांना दिला. त्यानुसार त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख असे ८० लाख रुपये घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पैसे दिल्यानंतर रुबिना यांनी जमीन देण्याची मागणी आरोपींकडे केली. त्यानुसार आरोपींनी शासकीय जमिनीची खोटी इसार पावती करून दिली. मात्र ही जमीन शासकीय असून त्याची विक्री करू शकत नाही, अशी माहिती रुबिना यांना मिळाली. हा बनवेगिरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रुबिना यांनी सिटी चौक पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.