छत्रपती संभाजीनगर : हिंगाेली : मराठवाड्यात विविध तालुक्यांमध्ये पुन्हा जोर ‘धार’ पाऊस झाला. शहरातही सायंकाळी विजाच्या कडकडाटासह पाऊस बरसून गेला. रोज सायंकाळी पाऊस पडत असून, हिंगोलीमध्ये अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. धाराशिव, लातूर जिल्ह्यात दुपारनंतर मुसळधार पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्ह्यातही एका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
हिंगाेली तालुक्यातील दुर्गसावंगी येथील शेत शिवारात पेरणीपूर्व मशागतीचे काम करताना बिस्मिल्ला खान (वय ३०) यांचा अंगावर वीज पडून गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. तर, कानरखेडा (खुर्द) येथे शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास बेबी सावके (वय ४५) या महिलेचा वीज पडल्याने मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी वारे व पाऊस सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातही अनेक भागांत मोठा पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सायंकाळी जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले.