एचआयव्ही ग्रस्त तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी मुंबईतल्या चार अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी मूळची जालन्याची आहे. भावाकडे मुंबईला राहत असताना तिच्यावर अत्याचार झाला. अलीकडेच आजारपणामुळे पीडित तरुणीला औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे तपासणी करताना तिच्यावर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. पीडित तरुणीची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मुंबईत राहत असताना मी एका मैत्रीणीकडे बर्थ डे पार्टीला गेले होते. त्यावेळी चार जणांनी मिळून माझ्यावर बलात्कार केला असे पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. प्रकृती गंभीर असल्यामुळे पीडित तरुणी आरोपींना ओळखू शकत नाही असे पोलिसांनी सांगितले.

मंगळवारी रात्री बलात्कार पीडितेच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. बेगमपुरा पोलिसांनी झीरो एफआयआर नोंदवून मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्थानकात एफआयआर वर्ग केला. कारण गुन्हा मुंबईत घडला होता. १४ जुलैला मला माझ्या मुलाचा फोन आला. मुलीची प्रकृती चांगली नसल्याचे त्याने मला सांगितले. त्यानंतर आम्ही तिला औरंगाबादला आणून रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरु असताना तिच्यावर बलात्कार झाल्याचे लक्षात आले.