छत्रपती संभाजीनगर: तामिळनाडूतील तिरुपूर येथील ओ. टी. टेक्सटाईल प्रा. लि. कंपनीकडून व्याजासह एक काेटी ३२ लाख ७१ हजार २९१ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार येथील व्यावसायिकाने सिडकाे एमआयडीसी पाेलीस ठाण्यात नाेंदवली आहे. त्यावरून कंपनीच्या पाच संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सिडकाे एन - १ मधील व्यावसायिक. श्याम त्रिलाेकचंद अग्रवाल (वय ४३) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून तिरुपूर येथील ओ. टी. कंपनीचे संचालक केशव सारडा, पवनकुमार सारडा, जयप्रकाश सारडा, पूनम सारडा, भरत सारडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा : बापरे…४६ लाखाला ऑनलाईन गंडा, आमिषाला बळी पडलेल्या शिक्षकाची फसवणूक तक्रारीनुसार श्याम अग्रवाल यांनी कंपनीच्या मागणीप्रमाणे जुलै २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत ७४ वेळा ३ कोटी ६९ लाख ७५ हजार ४६८ रुपयांचा कापसाचा धागा विक्री केला होता. या व्यवहारात देयकाची रक्कम दरसाल दर शेकडा १८ टक्के व्याजाने द्यायची असे ठरले होते. तसे देयकात नमूद असताना कंपनीच्या वरील पाच संचालकांनी ७४ बिलांपैकी १४ बिलाचा मालच मिळाला नाही, असे खोटे भासवून तो माल दुसऱ्याला विकला. १४ देयकाच्या वस्तू व सेवा कराचा परतावा मिळवून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.