छत्रपती संभाजीनगर : माजीमंत्री, आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली सिल्लोड भाजपचे शहराध्यक्ष कमलेश गोविंदराम कटारिया, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली व अमोल अशोक ढाकरे या तिघांवर दाखल गुन्हा आणि दोषारोपपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी गुरुवारी रद्द केला.

या प्रकरणी सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष अर्जुन बाबूराव गाढे यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार फेब्रुवारी २०२१ मध्ये दाखल केली होती. भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांचा सिल्लोड शहरात सर्वे क्रमांक ३९/३ मध्ये भूखंड आहे. या जागेवर कटारियांकडून संरक्षित भिंत बांधण्याचे काम सुरू होते. मात्र, नगर परिषद प्रशासनाने कटारिया यांना कोणतीही नोटीस न देता अचानक त्यांचे संबंधित बांधकाम तोडण्याची कारवाई केली होती. त्यामुळे तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सिल्लोड शहरात निषेध मोर्चा काढून आंबेडकर चौकात चक्काजाम केला होता. सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी समाजमाध्यमावर आंदोलनाच्या संदर्भातील चित्रफितीही प्रसारित केल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोर्चामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांना शिवीगाळ करून त्यांचा अपमान करण्यात आला असून, त्यामुळे कार्यकर्ते व समर्थक यांच्या भावना दुखावल्या, अशा आरोपाची तक्रार अर्जुन गाढे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरून भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारिया, महेश शंकरपेल्ली, अमोल ढाकरे या तिघांवर गुन्हा नोंद केला होता. आरोपांवरील पुरावे न देणे आणि तक्रारदाराचा संबंधित प्रकरणाचा कसलाही संबंध नसल्याचे मुद्दे खंडपीठात उपस्थित करण्यात आले. त्यावरून खंडपीठाने वरीलप्रमाणे गुन्हा व दोषारोपपत्र रद्द केले. गुन्हा रद्द करण्यासाठी वरील तिघांच्या वतीने ॲड. अंगद एल. कानडे यांनी बाजू मांडली होती.