सुहास सरदेशमुख
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडय़ाच्या दुष्काळी भागात ६०० फुटांपर्यंत खोल विंधन विहिरी खणून पाणी उपसा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पाण्यातील क्षार आणि कॅल्शिअमचे प्रमाण वाढले आहे. परिणामी टंचाईग्रस्त भागांत मूत्रविकारांचे प्रमाण वाढले आहे. यंदा ४९ तालुक्यातील भूजल घटले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एकूण बाह्य रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांमध्ये आता मूतखडा आणि मूत्रिपडाचे विकार आढळून येत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे निरीक्षण आहे. टंचाईग्रस्त गावांतून मूत्रिपडविकार आणि मूतखडय़ाचे रुग्ण वाढत असल्याचे मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. व्यंकट गीते यांनी सांगितले.

हेही वाचा >>>वंदे भारत रेल्वेची गती वाढविणार; मराठवाडय़ातील औद्योगिक क्षेत्रास फायदा- फडणवीस

छत्रपती संभाजीनगर येथील हेडगेवार रुग्णालयातील मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. एन. डी. कुलकर्णी म्हणाले, मराठवाडय़ात  दुष्काळामुळे पाण्यातील क्षाराचे प्रमाण अधिक आहे. अनेक छोटय़ा गावांतून आलेल्या रुग्णांमध्ये मूतखडा आणि मूत्रविकारांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. नांदेड, बुलडाणा या जिल्ह्यांत फ्लोराइडचे प्रमाणही अधिक आहे. सन २०१० ते २०१९ पर्यंत मराठवाडय़ात कमी पाऊस झाला. सन २०१२ मध्ये ६९ टक्के, २०१४-१५ मध्ये ५३ टक्के, २०१५ – १६ मध्ये ५६ टक्के आणि २०१८ – १९ मध्ये ६४ टक्के पाऊस झाला होता आणि आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या पावसाळय़ाच्या चार महिन्यांत सरासरी ५७ दिवस पाऊस पडत असे. या वर्षी तो ४३ दिवसच पडला. परिणामी धरणांमध्ये पाणीसाठा तर घटलाच शिवाय जमिनीतील भूजल पातळीतही घट झाली.

४९ तालुक्यांत भूजल पातळी घटली

या वर्षी भूजल सर्वेक्षण यंत्रणेने ८७५ विहिरींचे निरीक्षण केले. त्यानुसार ४९ तालुक्यांतील जलपातळीत घट झाली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर, घनसावंगी, अंबड, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, शिरुर, धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील भूजल पातळी पाच मीटरपेक्षा अधिक खोल गेली आहे. सरासरी पाच वर्षांच्या तुलनेतील घसरलेल्या पाणीपातळीमुळे खोलवर विंधन विहिरी घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

धाराशिव जिल्ह्यात विंधन विहीर खणण्याचा व्यवसाय करणारे राजभाऊ काळे म्हणाले, की पूर्वी आम्ही सरासरी ३५० ते ४०० फुटांपर्यंत विंधन विहिरी खणत असू. आता ५५० फुटांपर्यंत पाणी लागत नाही. एका विंधन विहिरीसाठी साधारणत: एक ते सव्वालाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

हेही वाचा >>>संभाजीनगरमध्ये ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ उद्घाटनप्रसंगी राडा, भाजपा अन् एमआयएमचे कार्यकर्ते भिडले; जलील टीका करत म्हणाले…

खोलवरून उपसलेले पाणी घातक

जमिनीच्या पोटातील खोलवरून उपसलेल्या पाण्यात आरोग्यास घातक धातू जास्त असतात. सर्वसाधारणपणे बीड, जालना, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जात असेल तर त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात, असे जल तपासणी अधिकारी एस. एस पाटील यांनी सांगितले. 

शुद्ध पाणी गरिबांच्या आवाक्याबाहेर

मूत्रिपडाचे विकार आणि मूतखडय़ाचे प्रमाण लक्षात घेऊन गावोगावी पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाचे खासगी उद्योग सुरू झाले असले, तरी गरीब व्यक्तींना पाणी खरेदी करणे परवडत नाही. सध्या मराठवाडय़ातील १४१ गावांमध्ये १७६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. १०४ विहिरी टँकरच्या पाण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते.