छत्रपती संभाजीनगर, जालना : मराठवाड्यात भारतीय वैद्यकीय संघटनेकडून (आयएमए) सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डाॅक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी २४ तासांचा बंद पुकारण्यात आला होता. या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला. या संपामुळे आरोग्य यंत्रणा मात्र ठप्प पडली होती.

छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात संघटनेकडून आयएमएचे अध्यक्ष डाॅ. अनुपम टाकळकर, डाॅ. योगेश लक्कास, डाॅ. यशवंत गाडे, डाॅ. उज्ज्वला दहिफळे, डाॅ. संतोष रंजलकर, मार्डचे डाॅ. स्वप्निल केंद्रे, डाॅ. ऋषिकेश देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. या संपामुळे शहरातील ५५० रुग्णालये बंद राहिली असून, २ हजार ५०० हून अधिक ॲलोपॅथिक डाॅक्टर व मार्डचे डाॅक्टर सहभागी झाल्याचे डाॅ. टाकळकर यांनी सांगितले.

जालन्यातील ८२५ डाॅक्टर संपावर होते. तर ३८० रुग्णालयांमध्ये शुकशुकाट होता. जालना शहर व जिल्ह्यातील छोट्या दवाखान्यांपासून ते मोठ्या इस्पितळांपर्यंत सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभर वैद्यकीय, आरोग्य यंत्रणा बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली. गुरुवारी सकाळी आय.एम.ए. हॉल येथे अध्यक्षा डॉ. चारूस्मिता हवालदार यांच्या नेतृत्वाखाली सर्व डॉक्टर्स एकत्र आले. राज्य सहसचिव डॉ. राजीव जेथलिया आणि अध्यक्षांनी शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविषयी माहिती देऊन संपाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी सचिव डॉ. सोनल रूणवाल, कोषाध्यक्ष डॉ. गोविंद पाटील, डॉ. श्रीमंत मिसाळ यांच्यासह डॉक्टरांची उपस्थिती होती. डॉक्टरांनी आमदार अर्जुनराव खोतकर, निवासी उपजिल्हाधिकारी महाडिक, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र पाटील, यांच्या भेटी घेऊन निवेदन दिले. आमदार खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आयएमएची बाजू मांडणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.

सीसीएमपी नोंदणीमुळे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेचा आंतरराष्ट्रीय दर्जा घटण्याची शक्यता वर्तवत या प्रकारामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेत गोंधळ निर्माण होऊन जनतेचा विश्वास कमी होईल, असे मत जालना आयएमएच्या अध्यक्षा डॉ. चारूस्मिता हवालदार यांनी नोंदवले.