भारतीय परंपरेतील तीन हजार वर्षांपूर्वीपासूनच्या इतिहासातील अहिंसा आणि करुणा ही मूल्ये आजही लागू पडतात. जगभरात ख्रिश्चन, इस्लाममधील शिया-सुन्नी यांच्यात धर्म, देव आणि धर्मग्रंथ जरी एक असले, तरी त्यांच्यात वाद घडत आहेत. पण भारतीयांमधील धार्मिक एकात्मता, सहिष्णुता आजही संदर्भहीन झालेली नाही. मन:शांतीसाठी ती आवश्यक आहे, असे मत बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्त केले. ते जागतिक धम्म परिषदेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पत्रकारांशी बोलत होते.
भारतीय विचारसरणीमधील डाव्या, उजव्या आघाडय़ांमुळे निर्माण होणाऱ्या संभ्रमाकडे कसे पाहता, या प्रश्नावर दलाई लामा म्हणाले, तुम्ही ही विचारसरणी राजकीय अंगाने पाहत आहात. भारताची मूळ विचारसरणी ही करुणा आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानामध्ये आहे. ही दोन मूल्ये न स्वीकारल्याने चीनसारखा देशही मागे आहे आणि भारतातील लोकशाहीची शिकवण अजूनही कायम आहे. एका विद्वानाशी चर्चा करताना चीन आता समाजवादी देश राहिला आहे का, असे विचारले होते. ते म्हणाले, तो आता पूर्णत: भांडवलशाही देश झाला आहे. कामगार आणि कष्टकरी व्यक्तींचे राज्य असावे, असा विचार करणारे मार्क्स हे निश्चितच भावणारे आहेत. पण लेनिन मात्र भावत नाही. त्यांचा प्रवास हिंसेच्या वाटेने जातो. पण अशा राजकीय विचारांपेक्षा भारतीय परंपरेचे तत्त्वज्ञान अहिंसा आणि करुणेमध्ये दडलेले आहे. मात्र, त्याचे शिक्षण दिले जात नाही. ती मूल्ये शिक्षण व्यवस्थेत असायला हवीत, असेही ते म्हणाले.
भारतीय पुत्र या त्यांच्याबाबत केल्या जाणाऱ्या उल्लेखावरही दलाई लामा यांनी आवर्जून प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘मला एकदा चीनच्या पत्रकाराने विचारले की, तुम्ही स्वतला भारताचे पुत्र का म्हणवता?’ त्याला उत्तर देताना मी म्हणालो, ‘गेली साठ वर्ष भारतात वास्तव्याला आहे. माझे मन हे नालंदा विचारसरणीशी एकरूप झाले आहे. या नालंदामधील तत्त्वज्ञ हे दक्षिण भारतातून अधिक आले आहेत, असे मी माझ्या उत्तर भारतातील मित्रांना डिवचण्यासाठी म्हणत असतो. पण या तत्त्वज्ञानी व्यक्तींनी बुद्धांचे तत्त्वज्ञान तपासून घेऊन त्याची तार्किकता जपली आहे. म्हणून ते मोठे आहेत. अशा नालंदामध्ये माझी जडणघडण झाली आहे. त्या अर्थाने मी भारतीय आहेच. हा देह देखील इथेच वाढला आहे. त्या अर्थाने मी भारताचा पुत्र आहे.’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून १९५६ मध्ये समाजाला दिशा देण्याचे काम केले. ते या देशातील जातिव्यवस्थेच्या चुकीच्या प्रथेविरोधात मोठे पाऊल होते, असे त्यांनी या वेळी अवर्जून नमूद केले. हिंदू संस्कृतीत गौतम बुद्धांना विष्णूचा नववा अवतार मानले जाते, याबद्दल तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न त्यांना विचारला असता दलाई लामा म्हणाले, ‘असे असूही शकते. हिंदू संस्कृतीवरही दोन-अडीच हजार वर्षे बुद्धांच्या शिकवणीचा प्रभाव आहेच. प्रत्येकाची परिभाषा वेगळी असली, तरी हिंदू, ख्रिस्ती, मुस्लीम, ज्यू अशा सर्वच धर्मामध्ये बुद्धांच्या शिकवणीचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा अंगीकार केलेला आहे.’