छत्रपती संभाजीनगर : कालसुसंगत चित्रपट आणि त्यातील मूल्य यात वाईट व्यक्तिरेखा कोणती, हे न ठरवता येणारा काळ आहे. जर संभ्रम नसता तर खूप साऱ्या व्यक्तिरेखा पकडता आल्या असत्या. पण वाईट कोणाला म्हणायचे, असा प्रश्न आहे. होते असे की, भौतिक सुख शोधण्याच्या नादात आपण आपले साहित्य, संगीत, संस्कृती यालाच एका फलाटावर सोडून आलो आहोत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘चोली के पिछे क्या है’ हे गाणे लोकप्रिय ठरते, तेव्हा घाबरण्याची वेळ आलेली असते. आता संवेदनशीलता आणि रसिकता याचा मिलाफ होत असताना अशा दिग्दर्शक आणि सिनेमा निर्मात्यांबरोबर आपण किती काळ राहतो, यावर भारतीय सिनेमाचे भवितव्य अवलंबून असेल, असे मत सुप्रसिद्ध गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>> जलजीवन मिशनची ‘कासवगती’! पाइपचा अपुरा पुरवठा, कुशल कामगारांची वानवा
नवव्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांना या महोत्सवात पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक अशोक राणे, उद्योगपती नंदकुमार कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, खरेतर आम्ही ज्या वेळेस चित्रपटांमध्ये संवाद लिहायला सुरुवात केली, तेव्हा आम्हाला त्यातले सामाजिक, आर्थिक परिणाम माहित नव्हते. आम्ही आपले करत गेलो. त्याला लोकांची पसंती मिळाली. पुढे त्यावर आम्ही न विचार केलेलेदेखील संदर्भ जोडले जाऊ लागले. पण उत्स्फूर्ततेने आम्ही ते काम केले. उत्तर भारतात वाढलेल्या माझ्यासारख्या व्यक्तींना महाराष्ट्राच्या कलाप्रेमाविषयी असणारा कलाकारांचा दृष्टिकोन यामुळे आपण भारावून गेलो.
हेही वाचा >>> यंदा १३२ दिवस उच्च न्यायालयाची दारे बंद, ही आहेत कारणे…
आपल्या पूर्वजांनी कविता, भाषा, साहित्य अशा अनेक बाबी आपल्याला शिकविल्या. मात्र, भौतिक सुविधा मिळविण्याच्या नादात आपण त्या बाबी फलाटावरच सोडून आलो. पण अजूनही छोट्या गावांमध्ये ते मूल्यसंस्कार जतन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जेव्हा राजेश खन्नाचा काळ होता आणि प्रेमगीतांनी चित्रपटविश्व व्यापलेले होते, तेव्हाचा हीरोही बंड करायचा, ते आई-वडिलांबरोबरचे आणि नात्यातले असायचे. कारण प्रेम केलेल्यांना लग्न करण्यासाठी हे बंड दाखविणारा एक कालखंड होता. पुढे सामाजिक पातळीवरील विषमता, कायदे, न्यायालय आणि असंवैधानिक बाबींच्या विरोधात उभारणारा नायक उभा ठाकला. आताचा काळ असा नायक उभा करता येण्यासारखा नाही. संभ्रमाच्या कालावधीत चित्रपटातील व्यक्तिरेखासुद्धा नीटपणे सापडत नाही. त्यामुळे आता चित्रपट पाहणाऱ्यांची अधिक आहे. ते जेवढे संवेदनशीलतेने व जबाबदारीने चित्रपटाकडे पाहतील तेव्हा भारतीय सिनेमाला बळ मिळेल.