नाशिक आणि मुळा धरण परिसरात झालेल्या पावसानंतर पैठणच्या जायकवाडी धरणात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे नाथसागरातील जलसाठा सायंकाळपर्यंत ८३.५२ टक्क्य़ांवर पोहोचला होता. प्रकल्पात अधिक पाणीसाठा ठेवता येत नसल्यामुळे नाथसागराच्या उजव्या व डाव्या कालव्यातून अनुक्रमे सुमारे ८०० व २०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जायकवाडी धरणाची पातळी रविवारी १५१८.४५० फूट तर ४६२.८२४ मीटपर्यंत पोहोचली होती. प्रकल्पात ६३ हजार ६५ क्युसेकने पाण्याची आवक होत होती. प्रकल्पात एकूण पाणीसाठा २५१०.५०५ दशलक्ष घनमीटर एवढा झाला असून त्यातील जिवंत पाणीसाठा हा १७७२.३९९ दलघमीपर्यंत झाला आहे. धरणातील पाणीसाठय़ाची टक्केवारी ८१.६४ एवढी पोहोचली होती.

धरणाच्या उजव्या कालव्यातून ८०० क्युसेकने तर डाव्या कालव्यातून २०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. नाथसागराच्या परिसराची पाहणी आमदार संदीपान भुमरे, धरणाचे अभियंता बुद्धभूषण दाभाडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता दीपक माने, सहायक नियंत्रण कक्ष अधिकारी राजाराम गायकवाड, नाथ संस्थानचे दादा बारे आदींनी केली आहे. तर पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांनी गोदावरी नदीकाठी केलेले अतिक्रमण काढून घेण्यात यावे, नागरिकांनी गोदावरी नदीच्या पात्रात उतरू नये, असे आवाहन केले आहे.

पैठणच्या तहसीलदारांनी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की जायकवाडी जलाशयातील पाण्यातून पैठण तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या १७ गावांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन पिण्यासाठी ०.५ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. हायड्रोइलेक्ट्रिसिटी जनरेशन प्रकल्पातून गोदावरीत सोडलेले पाणी पुन्हा उपसा करून प्रकल्पात सोडता येत नसल्यामुळे नदीकाठच्या गावांना पाणी सोडले तर टँकरची मागणी टळेल, असेही या पत्रात नमूद केले आहे.

दगडी धरण शाखाधिकाऱ्यांनी पैठणच्या जलविद्युत केंद्राच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना रविवारी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की विद्युत निर्मिती करून गोदापात्रात विसर्ग सोडण्यात येणार आहे. जायकवाडी निम्नबंधाऱ्याचे दरवाजे काढण्याची कार्यवाही रविवारी सायंकाळी ५.३० वाजता पूर्ण झालेली आहे. विद्युत निर्मिती करून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्याची कार्यवाही करण्यात यावी.

दवंडीद्वारे नागरिकांना माहिती

गोदावरी नदीपात्रात १५०० क्युसेकने पाणी सोडण्याचा निर्णय झालेला असून आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येत आहे. शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन दवंडीद्वारे करावे आणि त्याची चलचित्रीकरण करून ते मोबाइलवरून प्रत्येक गावात पाठवावे, असे पैठण तहसीलदार व तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने पोलीस पाटील यांना कळवले आहे. हा आदेश पोहोचवण्यासंदर्भात हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayakwadi dam heavy rainfall mpg
First published on: 12-08-2019 at 00:56 IST