आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक जाणिवेच्या भावनेतून जीवलग फाऊंडेशनच्या वतीने निलंगा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त ११ शेतकरी कुटुंबीयांना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून साडी, दोन महिन्यांचा किराणा व रोख ५ हजार रुपये तसेच सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमास आíथक मदत देऊन दिवाळीचा सण गोड करण्याचा प्रयत्न २१ जीवलग वर्गमित्रांनी केला.
विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुनील शेळगावकर, तहसीलदार दीपक आकडे, प्रा. गजेंद्र तरंगे, अॅड. सुनील विभुते, अनिल अग्रवाल, लक्ष्मीकांत सोमाणी, शरद दाताळ, मनोज इंदोरे, अकबर तांबोळी, सतीश सातपुते, श्रीकांत तोष्णीवाल, संतोष सूर्यवंशी, दिलीप मिनियार, अलीमोद्दीन सय्यद, रामेश्वर वाघमारे, श्रद्धानंद माने पाटील, सचिन ओगले, परमेश्वर साठे, सुदीप जाजू या शालेय जीवनातील वर्गमित्रांनी एकत्र येऊन जीवन फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, महसूल उपविभागीय अधिकारी डॉ. भवानजी आगे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी शेलार, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मागील तीन वर्षांत आत्महत्या केलेल्या तालुक्यातील ११ शेतकरी कुटुंबाला भाऊबीजेची ओवाळणी म्हणून साडी, मुलांच्या शिक्षणासाठी ५ हजार रुपये, ५ व्यक्तीच्या कुटुंबाला दोन महिने पुरेल एवढय़ा ५१ वस्तूंच्या किराणा मालाची मदत देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. याचवेळी सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमास आíथक मदत करण्यात आली.
या वेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी जीवलग फाऊंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. दुष्काळ नापिकी व कर्जाचा बोजा यास वैतागून न जाता आलेल्या दुखावर मात करून जीवन जगा. हताश होऊन हळव्या मनाने जीवन संपवण्याचा विचार करण्याऐवजी धीराने व संकटाने संकटाचा मुकाबला करा. आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत; तर प्रश्न निर्माण होतात म्हणून नराश्यवादी भूमिकेतून आत्महत्या करू नका. कुटुंबाचे व मुलाचे भविष्य उज्वल करण्यासाठी जीवनातील दुख बाजूला सारत संसार जिद्दीने व चिकाटीने उभा करा, असे आवाहन करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2015 रोजी प्रकाशित
जीवलग फाऊंडेशनची आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना भाऊबीजेची ओवाळणी
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक जाणिवेच्या भावनेतून जीवलग फाऊंडेशनच्या वतीने...
First published on: 04-11-2015 at 03:37 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jovlag foundation suicide family bhaubij