छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गवरील शेवगा शिवारात बुधवारी पहाटे एका शेतात मारलेल्या छाप्यामध्ये करमाड पोलिसांना लोखंडी १० धारदार तलवारी आढळून आल्या. उदयसिंग उर्फ विकी विजयसिंग बहुरे (वय ३०, रा. पद्मावती नगर, जालना. ह. मु. शेवगा), असे आरोपीचे नाव असून, या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शेवगा शिवारात विजन किसन सुलाने यांच्या शेतात छापा मारण्यात आला. तेथे उदयसिंग बहुरे हा सिमेंटच्या फार्मालगत बसलेला होता. त्याची हालचालही संशयास्पद होती. त्याच्या हातात एक पांढऱ्या रंगाची गोणी होती. त्यामध्ये काय असे विचारले असता सुरुवातीला उदयसिंगने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र गोणी ताब्यात घेतली असता त्यामध्ये १० लोखंडी धारदार तलवारी आढळून आल्या. या तलवारीची किंमत २० हजार असल्याची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली ही कारवाई करमाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश वाघ यांच्या पथकाने केली.