छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीदरम्यान पैशांचे आमिष तर असतेच असते. पण लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील आनंदवाडी या गावाने पुढाऱ्यांना निक्षून सांगितले, ‘आमच्या गावात पैसे वाटू नका, दारू पुरवठा तर चालणारच नाही.’ आता कोणी गावात मतदानासाठी पैसे द्यायला येत नाही. महिलांच्या हाती सत्ता असणाऱ्या आनंदवाडीमध्ये ग्रामपंचयातीच्या तीन टर्म बिनविरोध झाल्या आहेत. खुल्या प्रवर्गात सरपंच निवडण्याची मूभा असतानाही सध्या वर्षा विष्णू चामे यांना साऱ्यांनी बिनविरोध निवडले आहे. हे गाव आनंदात आहेच आणि आता तर निवडणुकीमध्ये आमिष नाकारणारे गाव म्हणून आनंदवाडीची सध्या मराठवाड्यात चर्चा आहे.

आनंदवाडीत ११२ घरे. प्रत्येक घराची मालकी महिलेची. म्हणजे फक्त घरावर पाटी लावून नाही तर मालमत्ता नोंदीमध्ये महिलेचे नाव. गावातील शेतीमध्येही महिलांचा ५० टक्के वाटा. त्यामुळे घरातील महिलेला विचारल्याशिवाय शेतीचे व्यवहारही होत नाहीत. गावात भंडाऱ्याची पंगत बसते तेव्हा पहिला मान महिलांचा. पुरुष जेवायला वाढतात. मुले, महिला जेवतात आणि पुरुषाची पंगत त्यानंतरची. अशा अनेक उपक्रमांनी गाव आदर्श करण्यासाठी माजी सरपंच ज्ञानोबा चामे प्रयत्न करत असतात. त्यांना माऊली म्हटले जाते. गावातील प्रत्येक निर्णय लोकसहभागी होतो, त्यामुळे अनेक उपक्रम राबवता येत असल्याचे चामे सांगतात.

हेही वाचा…पॅकेजच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्र्यांची सारवासारव; मराठवाडातील टंचाई आढावा बैठक वेळकाढूपणा असल्याची विरोधकांकडून टीका

अलीकडेच गावातील ४१७ जाणांनी अवयवदानाचे फॉर्म भरून नोंद केली. गावात एक पाटी आहे, सोयरिक करायची असेल तर हुंडा देता-घेता येणार नाही. गावातील गरीब घरातील मुलींच्या लग्नाचा प्रश्न गावकरी चर्चा करून सोडवतात. ग्रामपंचायत गावातील एक मंदिराच्या मालकीचे दुकानास भाडे आकारत नाही. त्याबदल्यात गावातील मुलींच्या लग्नाचा मंडप मंडपवाला मोफत मारून देतो. गावकरी पलंग – गादीपासून ते भांड्या- कुंड्याचे रुखवत मुलीला देतात. दीड-दोन लाखांचा खर्च सारे जण मिळून उचलतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या बजबजपुरीतही गावाने स्वत्व जपले. गावात प्रचारासाठी पैसे आणि दारू देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आणि विशेष म्हणजे पुढाऱ्यांनीही ते पाळल्याचे चामे सांगतात. फारच पैसे द्यायचचे असतील तर गावाच्या सार्वजनिक कामासाठी द्या, असे सांगण्यात आले. पण मतदान विकत घेता येणार नाही, असे गावकऱ्यांनी पुढाऱ्यांना ठणकावून सांगितले.

हेही वाचा…राज्यात भूजल वापर, नियंत्रणात बजबजपुरी

विविध उपक्रम…

याच गावातून पूर्वी विधवांना हळदीकुंकू आणि वाण लूटण्याचा मान मिळवून देण्यात आला होता. आता गावातील स्मशानभूमीला मसनवाटा असे कोणी म्हणत नाही. जे आईवडील प्रगतीसाठी झटतात ते मृत्यूनंतर अहीत कसे चिंततील, असा विचार रुजविण्यात आला आहे. स्मशानभूमीमध्ये आता व्यायामशाळा आहे. गावाचा एकोपा टिकावा म्हणून अनेक उपक्रम सुरू असतात त्यातूनच या गावाने निवडणुकीमध्ये मतदानासाठी पैसे देऊ नका, असे पुढाऱ्यांना सांगितल्याने विविध विकास चळवळीत काम करणाऱ्या गावांमध्ये सध्या आनंदवाडीची चर्चा सुरू आहे.