औरंगाबाद: महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादामध्ये केंद्र सरकारचा रस्ता कोणता हे आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट करावे आणि मगच ’ समृद्धी’ महामार्गाचे उद्धाटन करावे, अशी मागणी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सीमावाद प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री एस.आर बोम्मई हे अमित शहा यांना भेटून उपयोग होत नाही, असे म्हणत आहेत. ते त्यांच्या नेत्यांना आव्हान देणारी मस्तवाल भाषा बोलत आहेत. ही मुजोरी खपवून घेताना त्यांना कोणाचे आशीर्वाद आहेत, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्रात येताना पालक म्हणून बोला, राज्याला पालकाची भाजी समजू नका, असे म्हणत टोलावले. मराठवाडा साहित्य संमेलनात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
हेही वाचा >>> शहा यांचे ‘धडा शिकवला’ विधान आचारसंहिता भंग नाही; निवडणूक आयोगातील सूत्रांचे मत
समृद्धी महामार्ग व्हायलाच हवा, त्यासाठी महाविकास आघाडी सरकार असतानाही प्रयत्न केले होते. ते रस्ते होतीलच, पण राज्यात येणाऱ्या रस्त्याला जर कर्नाटक सरकार रोखत असेल तर पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांना काय बोलणार आहात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. याशिवाय बाळासाहेबांची जी भूमिका होती त्यास ‘बाळसाहेबांची शिवसेना’ म्हणून तुमच्याकडे आलेल्यांनीही भूमिका स्पष्ट करायला हवी, असेही ते म्हणाले. साहित्य संमेलनामधून कर्नाटकातील मराठी भाषकांविषयीचा कळवळा व्यक्त व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हा भाषिक अत्याचार मराठीवर होतो आहे, असेही ठाकरे म्हणाले. आम्ही कधी कानडी भाषेचा दुस्वास केलेला नाही. ती आमच्या संतांची शिकवणही नाही. पण कोणी यावे आणि अक्कोलकोट घेऊन जावे, पंढरपूरवर दावा सांगावा असे होणार नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली स्पष्ट आणि परखड मते महाराष्ट्र आणि कर्नाटकासमोर ठेवावीत, असे ठाकरे म्हणाले. या वेळी राज्यपाल कौश्यारी यांच्यावर त्यांनी टीका केली. त्यांना आता राज्यपालही म्हणता येणार नाही. त्यांना कोश्यारीच म्हणावे लागेल.