समाज माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर प्रेम जडले आणि त्यानंतर अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या अत्याचाराचे छायाचित्रण करुन धमक्या देणाऱ्या आरोपीस व त्याच्या मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन फिर्यादीने चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोन्ही आरोपी फरार आहेत.
समाजमाध्यमांवर ओळख झाल्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीबरोबर शरीर संबंध निर्माण केले. त्याचे छायाचित्रण केले. या छायाचित्रणाच्या आधारे आणखी एका मित्रानेही मुलीची छेड काढली. अतुल संजय राठोड, यशवंत किसनराव पवार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अतुल याने अल्पवयीन मुलीस समाज माध्यमातून मैत्रीचा प्रस्ताव दिला.
मैत्रीला होकार दिला त्यातून दोघांमध्ये संवाद वाढला. त्यानंतर एकमेकांच्या दूरध्वनींची देवाण-घेवाण झाली. पुढे दोघांमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण झाले. काही दिवसातच अतुलने धमावून अल्पवयीन मुलीस शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचे छायाचित्रण केले. ते चित्रण समाजमाध्यमांवर पुन्हा टाकू अशी धमकी दिली. आरोपीच्या मित्रानेही अल्पवयीन मुलीची छेड काढली. या संपूर्ण प्रकरणाला कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीने कुटुंबीयांना ही बाब सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.