छत्रपती संभाजीनगर : परीक्षेच्या काळात नियमित तासिका होतात का नाही या संदर्भाने महाविद्यालयांनाही ‘अचानक भेटी’ देण्यात येतील. प्राध्यापकांनाही यंत्राद्वारे (बायोमेट्रिक) हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे, असे सांगत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी परीक्षेचा कालावधी, उत्तर पत्रिकांचे मूल्याकंन या संदर्भात अमुलाग्र बदल करण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी येथे दिली.
विद्यापीठाचा पदव्यूत्तर विभाग संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र १६ जूनपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी या विभागांचे प्रमुख तसेच कायमस्वरुपी प्राध्यापक यांची बैठक घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी विद्यापीठ नाटयगृहात प्राचार्यांची सहविचार सभा घेण्यात आली. बैठकीस प्र-कुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची मंचावर उपस्थिती होती. तसेच सर्व अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. फुलारी म्हणाले, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात वार्षिक दिनदर्शिकेचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्यात येईल. महाविद्यालयनिहाय प्रवेश समिती स्थापन करावी तसेच ३० जूनपूर्वी तासिकांचे नियोजन करण्यात यावे. कॉलेजमधील प्राध्यापकांनाही बायोमेट्रिक राहणार असून विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या कार्यभाराप्रमाणे उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तसेच २०२७ मध्ये विद्यापीठ ‘क्युएस रँकींग’ला सामोरे जाणार आहे. ‘ट्रिपल ए’ पदव्यूत्तर महाविद्यालयांची पडताळणी यात कसल्याही प्रकारे मुदतवाढ देण्यात येणार नाही. मुदतवाढ मागणे ही पळवाट असते, असेही ते म्हणाले.
कुलगुरूंचे सहविचार सभेतील महत्त्वाचे मुद्दे
- महाविद्यालयातील प्राध्यापकांचे ‘कॅश’ विद्यापीठात होणार.
- ‘नॅक’ नवीन नियमावली समजून घेण्यासाठी जिल्हानिहाय कार्यशाळा घेणार.
- महाविद्यालयांना नियमित तासिका घेऊन विद्यापीठास हजेरी पाठवावी लागणार.
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदासाठी प्रत्येकी ५० हजार व एक लाखांचे अनुदान देणार.
- सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांना ‘आदर्श’ पुरस्कार देणार.
- एकदा जाहीर केलेली दंड माफी, कमी करणार नाही. विद्यापीठात कुठे अडवणूक झाल्यास थेट कुलगुरूंना प्राचार्यांना भेटता येईल.
क्यूएस रँकींग म्हणजे काय ?
आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठांमधील शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन ठरवले जाते. जगातील २०० विद्यापीठांची एक यादी तयार केली जाते. त्यानुसार विद्यापीठही २०२७ मध्ये क्यूएस रँकिंगला सामोरे जाणार असल्याचे कुलगुरू डाॅ. फुलारी यांनी सांगितले.
ट्रिपल ए म्हणजे ?
ॲकॅडमिक ॲण्ड अकाऊंटिंग ऑडिट अर्थात -शैक्षणिक लेखा अंकेक्षण केले जाणार असून त्यात कोणतीही सूट मिळणार नाही.