विभागात चार हजार टँकर सुरू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहिणीनंतर मृग नक्षत्र अजून तरी कोरडेच जात असून, गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी दिसत असली तरी मान्सूनच्या पावसाचे आगमन लांबवले आहे. त्यामुळे पावसाची मोठय़ा अपेक्षेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सलग तीन-चार वर्षे तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना आता मात्र पावसाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. जूनच्या मध्यावर आजही मराठवाडय़ातील तब्बल ४ हजार गावांना तेवढय़ाच टँकरद्वारे पाणी पुरवले जात असल्याचे चित्र आहे.

मराठवाडा विभागातील २ हजार ९७२ गावे, तसेच १ हजार १७ वाडय़ांना सध्या ४ हजार १७ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ात ६७३ गावे ३४ वाडय़ांना ९३७ टँकरद्वारे, जालन्यात ५०७ गावे ७४ वाडय़ांना ६०६ टँकर, परभणी २२२ गावे ४८ वाडय़ांना २९१ टँकर, हिंगोलीत ५४ गावे २ वाडय़ांना ५१ टँकर, नांदेड २३५ गावे १४३ वाडय़ांना ३६० टँकर, बीड ७४१ गावे ६४२ वाडय़ांना ९६२ टँकर, लातूर २६२ गावे ५४ वाडय़ांना ३६० टँकर, तर उस्मानाबादमध्ये २७८ गावे २० वाडय़ांना ४४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात एकूण ८ हजार ३४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मागील आठवडय़ात २ हजार ९५६ गावे आणि १ हजार २७ वाडय़ांना ३ हजार ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता.

लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्य़ांत कमी-अधिक स्वरुपात मान्सूनपूर्व दमदार सरी बरसल्या असल्या, तरी इतरत्र मात्र पावसाचा टिपूस नाही. झालेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत आहेत. सोमवारीही बहुतेक ठिकाणी आकाशात ढग जमा झाले होते. मात्र, उस्मानाबादचा काही भाग वगळता कुठेही चांगला पाऊस झाल्याचे वृत्त नाही.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwada waiting for energetic monsoon
First published on: 14-06-2016 at 01:58 IST