छत्रपती संभाजीनगर : हॉटेल ‘विट्स’चा व्यवहार आपला मुलगा सिद्धान्त शिरसाट यांच्यासह पाच भागीदार व्यावसायिकांनी केला आहे. आमच्या मुलाने काय उद्योग करू नये काय, तुमच्यासारखी दलालीच करावी का, असा प्रश्न उपस्थित करत शहरातील हॉटेल व्यवहारात सिद्धान्त उतरले असल्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी मान्य केले. सिद्धान्त साहित्य व खरेदी व पुरवठा या संस्थेस ६० कोटी ८३ लाख रुपयांनी हा लिलाव महसूल प्रशासनाने मान्य केला होता. या व्यवहारातील २५ टक्के रक्कम अग्रीम भरल्यानंतर तो व्यवहार पूर्ण केला जाईल.

हे हॉटेल घेण्यासाठी पाच भागीदारांनी बँकेकडे कर्ज घेण्याचे ठरवले आहे. हे कर्ज घेण्यासाठीही तीन महिन्यांची मुभा व्यवहारात आहे. त्यामुळे व्यवहारातील पाच भागीदारांच्या वाट्याला बँक कर्जाशिवाय कमी रक्कम येईल, असा दावा शिरसाट यांनी केला. हॉटेल ‘विट्स’चा व्यवहार विशिष्ट कंपनीला मिळावा, असा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. तिन्ही कंपन्यांचे दर स्पर्धात्मक नव्हते. जूने मूल्यांकन अधिक असताना ते कमी दाखवून हा व्यवहार होत असल्याची तक्रार दानवे यांनी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘विट्स’च्या व्यवहारातील लिलावावर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर या व्यवहारात आपला मुलगाच असल्याचे शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना मान्य केले. ‘विट्स’ व्यवहाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तक्रारीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यानंतर खळबळ उडाली. एवढा व्यवहार करण्यासाठी पैसे कोठून आणले, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर नशा करून विरोधक आरोप करत आहेत. बँकेचे कर्ज घेऊन मुलगा व्यवसायात उतरत असल्याचे शिरसाट म्हणाले.