बिपीन देशपांडे

औरंगाबाद : फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ातही शेतकऱ्यांचा कापूस निम्म्यावर घरातच थप्पी लावून पडला आहे. तर जीनिंग व्यावसायिकांच्या मते २५ टक्केच कापूस बाजारपेठेत आलेला आहे. करोना ओसरू लागल्यानंतर जागतिक बाजारपेठ खुली होऊन अचानक कापसाला मागणी वाढली आणि दर क्विंटलमागे ११ हजारांच्या उच्चांकांपर्यंत पोहोचले होते. यंदाही गतवर्षीची पुनरावृत्ती होईल, या आशेवर शेतकरी असून व्यापारीवर्ग मात्र, जागतिक स्तरावरील कापसाच्या खंडीचे (गाठी) दर पाहता सध्या आहे त्या दरापेक्षाही अधिक घसरण होईल, अशी शक्यता वर्तवत आहेत.

भारतीय कापूस निगमही (सीसीआय) गतवर्षीएवढे उच्चांकांपर्यंत दर वाढण्याची शक्यता नसल्याचेच सांगत आहे. या हंगामात सीसीआयकडून मराठवाडा व खान्देश भागात ३७ खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यातील सोळा केंद्रांवर आतापर्यंत २८ हजार ५०० क्विंटलच खरेदी झाली आहे. मराठवाडा, खान्देशमधील सीसीआयच्या केंद्रांवर ४० लाख गाठी होतील, एवढी कापसाची खरेदी केली जाते.  अपेक्षेपेक्षा खूपच कमी आवक कापसाची केंद्रांवर होत असल्याचे सांगण्यात आले आहे. सीसीआय सध्या आठ हजार १०० रुपयांच्या दराने कापूस खरेदी करत आहे. तर खासगी जीनिंग व्यावसायिक शेतकऱ्यांकडून जागेवर जाऊन सात हजार आठशे ते नऊशे रुपये दराने कापूस खरेदी करत आहे. 

दर गतवर्षीप्रमाणे उच्चांक गाठेल, या आशेवर शेतकऱ्यांनी थप्पी (पहिल्या वेचणीतील माल) लावून कापूस साठवण करून ठेवला आहे. घरात साठवून ठेवलेल्या कापसाला होपा, पिसवा (बारीक कीड) लागत असून त्यातून खाज सुटून त्वचेला बाधा पोहोचत आहे. कापूस किती दिवस घरात सांभाळायचा, अशी विवंचना असली तरी व्यापाऱ्यांकडून जागेवर येऊन होणारी खरेदी आणि लग्नसराईचा हंगाम पाहता अनेक शेतकरी मिळेल त्या दरामध्ये कापूस विक्री करत असल्याचे शेतकरी विश्वंभर होके यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जीनिंग व्यावसायिकांच्या मते केवळ २५ टक्केच कापूस बाजारपेठेत आलेला आहे. म्हणजे ७५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच आहे. भारतातील कापसाचे दर इतर देशांच्या तुलनेत अधिक आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरून खरेदी होणाऱ्या गाठींचा दर ५५ ते ६० हजार रुपये खंडी (एक खंडी ३५६ किलोची) आहे. तर आपल्या भागातील कापसाची खंडी ही ६० ते ६५ हजार रुपयांच्या घरात पडते आहे. धागेनिर्मिती करणाऱ्यांना आपला कापूस परवडत नाही. मजूर बसून असल्यामुळेच जीनिंग व्यावसायिक सध्या सात हजार ८०० रुपयांनी कापूस खरेदी करतो आहोत.

– ओंकार खुर्पे, जीनिंग व्यावसायिक