scorecardresearch

टाळ, मृदंगाचे दरही चढे ! ; टाळेबंदीनंतर पहिल्यांदाच वाद्यनिर्मिती व दुरुस्तीलाही वेग

या वर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिरसातील वारीमध्येही महागाईची झळ बसत आहे.

musical instrumnet
औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर भागातील वाद्यनिर्मिती व दुरुस्तीचे काम आता वेगात सुरू आहे. (छाया : सावेश जाधव)

औरंगाबाद: भागवत धर्माची पताका उंचावत विठुरायाच्या चरणी निघालेल्या दिंडय़ा, वारीमध्ये सहभागी होऊन जगणे सार्थकी लागल्याची भावना मनी दाटलेल्या मराठी माणसाला या वर्षी टाळ खरेदी करताना आणि मृदंगावर नव्याने शाई लावतानाही जरा अधिकच पैसे मोजावे लागले.  टाळेबंदीनंतर मृदंगासह विविध वाद्यांची निर्मिती व दुरुस्ती करणाऱ्यांसाठी ही वारी जराशी नफा देणारी आहे. कारण एका टाळाची किंमत ५५० रुपयांपर्यंत वाढली, तर साडेपाच हजार रुपयांपासून मिळणारे मृदंग आता दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले आहेत.

‘आता नमू रंगभूमिका, कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, त्यां माझे दंडवत’ असा नामदेवांचा अभंग कीर्तनी टाळ- मृदंगाचे महत्त्व सांगणारा. वारीला जाण्यापूर्वी तसेच हरिनाम सप्ताहाची तयारी सुरू होण्यापूर्वी वाद्य निर्मिती करणाऱ्यांची घाई सुरू असते. मोठय़ा शहरातील बहुतांश शाळांमध्येही स्वतंत्र संगीत विभाग आहेत. औरंगाबादसारख्या शहरात ४५० हून अधिक तबल्याचे शिकवणी वर्ग आहेत. वारी, स्वातंत्र्य दिनाच्या तयारीचा भाग म्हणून जुलैमध्ये मृदंग, टाळ याचबरोबर विविध वाद्यांच्या दुरुस्तीचा काळ सुरू होतो. औरंगाबाद शहरात या व्यवसायातील शरद तौर म्हणाले, ‘आता वारीचे काम तसे संपत आले आहे. करोनानंतर अनेक वस्तूंचे भाव वाढले तसे टाळ व मृदंगांचेही दर वाढले आहेत. ’ भक्तिरसातील ब्रह्मरस हवा असेल तर टाळ- मृदंग हवाच असे कीर्तनकारही सांगतात. या वर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिरसातील वारीमध्येही महागाईची झळ बसत आहे.  या वर्षी दररोज एक नवा आणि पाच जुन्या मृदंगाचे काम करावे लागत असल्याचे वाद्य निर्मिती व दुरुस्ती क्षेत्रातील कलाकार सांगत आहेत.

दरवाढ कशामुळे ?

स्टीलचे दर वाढल्याने टाळाचे दर वाढले आहेत. तर चमडा तसेच लाकूड उत्तर प्रदेश, गुजरात व तामिळनाडू मधून आणावे लागते. इंधन दरवाढीमुळे मृदंगाचे दरही वाढले आहेत.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Music instruments rate increase for the first time after lockdown zws