औरंगाबाद: राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कामगारांवर मेस्मा लावण्याऐवजी राज्य सरकारने चर्चा करून प्रश्न सोडवावेत. खरे तर कामगारांचे प्रश्न सुटावेत म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले. पण राज्य सरकारकडून एक पाऊलही पुढे पडत नाही. कारण हे सरकारच असंवेदनशील आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत २३ नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीची रणनीती आणि आखणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील औरंगाबाद येथे आले होते. या वेळी केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांचीही उपस्थिती होती. एस.टी.चा संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एकाचा नुकताच मृत्यू झाला. तरीही या प्रश्नी सरकारला चर्चा करावीशी वाटत नाही. कारण हे सरकारच असंवेदनशील असल्याची टीका करत शिवसेनेच्या मुखपत्रातून होणाऱ्या टीकेकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, त्यांचे नेते आता सोनिया आणि राहुल गांधी झाले आहेत. नायर रुग्णालयाला लागलेली आग असेल किंवा अन्य रुग्णालयास लागलेल्या आगीच्या घटना बघता सरकारने काही तरी करायला हवे. पण ते काहीच करत नसल्याचे फडणवीस म्हणाले. नगरपंचायत निवडणुकांसाठी त्यांनी जिल्हानिहाय बैठका घेतल्या. प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. या बैठकांमध्ये लातूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तक्रारी केल्या.