छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय संरक्षण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने (एनसीसी ) बुधवारी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांना ‘कर्नल कमांडट’ या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात बुधवारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास एनसीसी छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर ए. जी. बरबडे, कमांडिंग ऑफीसर कर्नल बीपीएस ठाकूर, प्र-कुलगुरू डाॅ. वाल्मीक सरोदे, कुलसचिव डाॅ. प्रशांत अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय छात्रसेनेचे पन्नास सैनिक उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांना ‘कर्नल कमांडट’ ही मानद पदवी प्रदान कमांडिंग ऑफीसर कर्नल बीपीएस ठाकूर यांनी प्रस्तावित केली होती. तर ग्रुप कमांडर ब्रिगेडियर ए.जी. बरबडे यांनी प्रस्ताव पुढे पाठवला होता. एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगींदर सिंग (व्हीएसएम) यांनी या संदर्भातील शिफारस केली. तर लेप्टनंट महासंचालक लेप्टनंट जनरल गुरबिरपाल सिंग यांनी ‘कर्नल कमांडंट’ पदवी जाहीर केली होती. त्यानंतर केंद्र शासनाच्या राजपत्रात घोषणा करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देशातील १३ विद्यापीठाच्या कुलगुरुंना ‘कर्नल कमांडंट’ पदवी जाहीर करण्यात आली.