नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू शकतो, असं वक्तव्य केलं. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच “आम्हाला सतरंजा उचलायला ठेवलं का?” असा प्रश्न कार्यकर्ते विचारतील, असं विधान केलं. ते बुधवारी (११ जानेवारी) औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “कुठलाही पक्ष असेल तो आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, हुरूप येण्यासाठी स्वबळाची भाषा करतो. जर आम्ही एवढेच मतदारसंघ लढणार आहोत असं त्या पक्षाने म्हटलं, तर बाकीच्या मतदारसंघातील लोक म्हणतील की, आम्हाला काय फक्त सतरंजा उचलायला ठेवलं आहे का?”

“शेवटी काँग्रेसचे अंतिम निर्णय सोनिया गांधी घेणार आहेत”

“स्वबळाची भाषा बोलायची असते. शेवटी काँग्रेसचे अंतिम निर्णय सोनिया गांधी घेणार आहेत किंवा मल्लिकार्जून खरगे घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अंतिम निर्णय शरद पवार घेतील, तर शिवसेनेचे निर्णय उद्धव ठाकरे घेतील. त्यामुळे आम्ही कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला, तरी या तीन पक्षाच्या सर्वोच्च व्यक्ती त्याच आहेत,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

“स्वबळाची भाषाही बोलावी लागते”

“ते जो निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी त्या त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी करतील. ते प्रत्येकाचं काम असतं. असं असलं तरी तसंही करून चालत नाही, अशी स्वबळाची भाषाही बोलावी लागते,” असंही त्यांनी नमूद केलं.

“आपल्याला उद्या सर्व जागा लढवायच्या आहेत”

अजित पवार पुढे म्हणाले, “उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला, तर सगळीकडे राष्ट्रवादीमय वातावरण करण्यासाठी सर्वांनी कामाला लागा, आपल्याला उद्या सर्व जागा लढवायच्या आहेत, असं जर म्हटलो, तर लढू शकतो का? आज जेवढे पक्ष आहेत त्यांची महाराष्ट्रातील सर्व जागा लढवण्याची तयार आहे का? प्रत्येकाचे काही चांगले-वाईट मुद्दे आहेत. काहींनी जागा लढवायचं ठरवलं तरी त्यांचे डिपॉझिट जप्त होतील.”

हेही वाचा : हसन मुश्रीफांवर ईडीचे छापे, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “माझं स्पष्ट मत आहे की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या बारामतीत मागच्यावेळी भाजपाचं डिपॉझिट जप्त झालं”

“आता माझ्या बारामतीत मागच्यावेळी भाजपाचं डिपॉझिट जप्त झालं होतं. केंद्रात सत्तेत होते, राज्यात सत्तेत होते, तरी डिपॉझिट जप्त झालं. असं असतं, शेवटी लोकशाही आहे. लोकांच्या मनात आहे तेच होतं. जसं त्यांचं काही ठिकाणी डिपॉझिट गेलं, तसं आमचंही काही ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं. इतरही पक्षांचं गेलं,” असं अजित पवार यांनी सांगितलं.