जालना : सध्याचे राजकारणच असे झाले आहे की, कुणीही विरोधी पक्षात राहायला तयार नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मत व्यक्त केले आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दानवे म्हणाले, आपण स्वतः बत्तीस वर्षे विरोधी पक्षात काढली. आपण विरोधी पक्षात असताना प्रवाहाच्या विरुद्ध संघर्ष करून निवडून आलो. आज आपण लोकसभा सदस्य नसलो तरी जनाधार गमावलेला नाही. जालना जिल्ह्यात काही मंडळी भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थती आहे.
विरोधी पक्षात जीवच उरलेला नाही. म्हणून विरोधी पक्षांतील कार्यकर्ते भाजप किंवा अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षांमध्ये जात आहेत. ज्या पक्षात राजकारणाची सुरुवात केली त्या पक्षात राहायला विरोधी पक्षांतील अनेक जण आता तयार नाहीत. कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते फोडणे हे भाजपचे धोरण नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाची विचारधारा पटत नसेल आणि नरेंद्र मोदी यांची विचारधारा पसंत पडत असेल म्हणून त्या पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे दानवे म्हणाले. आमच्यामध्ये आल्यावर भाजपची ध्येय-धोरणे आणि कार्यपद्धती याचा विचार करून या मंडळींना आपली राजकीय दिशा ठरवावी लागेल, असेही दानवे म्हणाले.
विरोधी पक्षातील अनेक नेते वैफल्यग्रस्त अवस्थेत असून, हात वर करून मित्रांचा शोध घेत आहेत, असे सांगून दानवे म्हणाले, ठाकरे ज्यांचे नाव काढू देत नव्हते त्या राज ठाकरे यांच्याशी त्यांना हातमिळवणी करावी लागत आहे. कुणासोबतही जाण्याची अपरिहार्यता त्यांच्यात निर्माण झाली आहे. ते दोघे एकत्र आले तरी त्यांचे मतदार एकच असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा भाजप आणि मित्रपक्षांसमोर निभाव लागणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र येण्यास आमचा विरोध नाही, त्याचे आम्ही स्वागतच करतो. काँग्रेस आणि अन्य अनेक विरोधी पक्ष परिवारांचे पक्ष आहेत. परंतु, भाजप पक्ष म्हणजेच एक परिवार आहे, असेही ते म्हणाले.