छत्रपती संभाजीनगर : राज्यातील २१ व्या पशुगणनेत एकूणच पशुधनाची संख्या अर्धा कोटीवर घटल्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच ‘इतिहास’ जमा गणल्या गेलेल्या मराठवाडी देखण्या देवणी व लाल कंधारी या देशी गोवंशांच्या संख्येत मात्र, लक्षणीय वाढ झाली आहे. देवणी व लाल कंधारी गोवंशांची संख्या राज्यात मिळून २ लाख ९१ हजार ६२६ पर्यंत असून, गतवर्षात पार पडलेल्या २१ व्या पशुगणनेत ही संख्या ५० टक्क्यांनी वाढल्याचाही अंदाज आहे.
मराठवाड्यातील लातूर, नांदेड, धाराशिव व हिंगोली ही चार जिल्हे समाविष्ट असलेल्या लातूर पशुसंवर्धन आयुक्तालयांतर्गत देवणी व लाल कंधारी व त्या दोन्हीसम शुद्ध गोवंशाची संख्या अधिक दिसते आहे. लातूर विभागात शुद्ध लाल कंधारी २९ हजार ५१६ नर तर ६६ हजार ८९१ मादींच्या संख्येत आहेत. लाल कंधारींसारख्याच नर गोवंशांची संख्या लातूरमध्ये १९ हजार ९२५ तर ४२ हजार २१७ मादी आहेत. शुद्ध देवणी गोवंशांची लातूर विभागातील चार जिल्ह्यांमध्ये मिळून ३१ हजार ३४ तर मादीमध्ये ८० हजार ६९ एवढी संख्या आहे. देवणीसारख्याच गोवंशांची संख्या २ हजार १९५ तर ५ हजार ५८९ मादींची संख्या आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देवणी नर गोवंशांची संख्या ६ हजार ६२५ तर १४ हजार ४८२ मादी आहेत. देवणीसारख्या दिसणाऱ्या नरांची संख्या २ हजार २७८ तर ४ हजार ५३९ मादींची संख्या आहे. शुद्ध नर लाल कंधारींची संख्या १३ हजार ९९८ तर २६ हजार ७१० मादींची संख्या आहे. लाल कंधारींसारख्या नरांची संख्या ४ हजार ८४३ तर ८ हजार ६४८ मादींची संख्या आहे.
देशी गोवंश संवर्धन धोरणांतर्गत त्यांच्या वृद्धीसाठी ग्रामीण भागातील प्रत्येक पशुचिकित्सालयात शुद्ध वीर्य अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. देवणी, लाल कंधारींसह खिल्लारी, गीर, साहिवाल व डांगी या देशी गोवंशांचे वीर्य उपलब्ध आहे. गोळव या गोवंशाचेही वीर्य उपलब्ध करून दिले जाते. या अनुषंगाने पशुपालकांमध्ये जनजागृतीही केली जाते.- डाॅ. असरार अहमद,सहायक आयुक्त, पशुसंवर्धन