छत्रपती संभाजीनगर – सातारा येथे होऊ घातलेल्या ९९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले विश्वास पाटील यांच्या अनेक साहित्यातील कथाबीज चोरलेले असल्याचा एक आरोप त्यांचेच बंधू तथा ‘दाह’ या कादंबरीचे लेखक सुरेश पाटील यांनी केला आहे. ‘पानिपत’कारांनी त्यांच्या ‘लस्ट फाॅर लालबाग’ या कादंबरीमध्ये ‘दाह’मधीलच कथाबीज घेतल्याचे सुरेश पाटील यांनी एका लेखामध्ये म्हटले आहे आणि साहित्य वर्तुळातही विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्यातील अनेक घटना, पात्रांमध्ये अन्य काही साहित्यातील साधर्म्य आढळून येते. शिवाय त्यांच्यावर प्रशासकीय नोकरीदरम्यानचा एक गुन्हाही दाखल आहे. त्यामुळे विश्वास पाटील यांचे संमेलनाध्यक्ष होणे हे मराठीचा अपमान असल्याने त्यांची निवड रद्द करावी, अशी मागणी सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार यांच्यासह साहित्य महामंडळाशी संबंधित पदाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष तथा जयभीम शिक्षण, कला, सांस्कृतिक, क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव नागराज गायकवाड यांनी येथे दिली.

गायकवाड यांनी लेखक तथा विश्वास पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांनी १७ जानेवारी २०१६ रोजी लिहिलेल्या एका लेखातून पानिपतकारांवर चोरी केल्याचा आरोप केला आहे. यासह अन्य साहित्य वर्तुळातून होणारे आणि विश्वास पाटील यांच्यावर प्रशासकीय अधिकारी असताना झालेले झालेल्या आरोपांकडेही मंत्री शेलार यांचे पाठवलेल्या निवेदनात लक्ष वेधल्याचे गायकवाड म्हणाले.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी असताना जुहू येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवताना विश्वास पाटील यांनी असंख्य संचिका निकाली काढल्या होत्या, पाटील यांनी स्वत:च्या पत्नीलाही भागीदार बनवून सदनिका मिळवली असून, याप्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शिवाय समाजमाध्यमावरील एका वाहिनीवर आरक्षण विषयावर चर्चा करत असताना अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केले होते, ‘मला केवळ जातीचा दाखला न मिळाल्यामुळे कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली काम करावे लागत आहे, असे त्यांचे वक्तव्य होते. अशा व्यक्तीला संमेलनाध्यक्ष बनवणे म्हणजे जातीयवाद करणाऱ्यांना एक प्रकारे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यासारखा प्रकार आहे, असे नागराज गायकवाड यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती प्रा. उषा तांबे, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मसापचे कार्यवाह डाॅ. दादा गोरे, आदींनाही पाठवल्याचे गायकवाड यांनी सांगितले.