लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : पाच वर्षांपूर्वी ‘महायुती’वर भरभरून प्रेम करणाऱ्या मराठवाड्याने यावेळी भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अक्षरश: खड्यासारखे बाजूला केले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीडमध्ये पंकजा मुंडे या बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभूत झाल्या. लातूर, नांदेड आणि जालना हे मतदारसंघ काँग्रेसने खेचून घेतले. ठाकरे गटाला मराठवाड्यात सहानुभूती होतीच. छत्रपती संभाजीनगरचा अपवाद वगळता हिंगोली, परभणी आणि धाराशिव मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने दणदणीत विजय मिळवला. महायुतीच्या पारड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची केलेल्या संभाजीनगरची जागा आली. येथून संदिपान भुमरे विजयी झाले. पूर्वी सात महायुतीच्या बाजूने तर एक एमआयएम असे मराठवाड्यातील राजकीय बलाबल होते. आता काँग्रेस तीन, उद्धव ठाकरे तीन, असे झाले असून बीडची जागा कोणाच्या वाट्याची हे चित्र हे वृत्त लिहीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते.मराठवाड्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासमोर आपला उमेदवार असूच नये, अशी रचना भाजपकडून करण्यात आली होती.
मराठवाड्यातून निवडून आलेले खासदार
● धाराशिव – ओम राजेनिंबाळकर यांचा तीन लाखांहून अधिक फरकाने विजय
● हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर यांचा एक लाखाच्या फरकाने विजय
● परभणी – संजय जाधव यांचा तिसऱ्यांदा विजय
काँग्रेसने मराठवाड्यातील आठ जागांपैकी तीन जागांवर विजय मिळवला. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील काँग्रेसला वाली कोण, असा प्रश्न भाजपकडून उपस्थित केला जात होता. मात्र, केवळ अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये काँग्रेसने यश मिळवले. तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सहावा विजय कल्याण काळे यांनी रोखून धरला. ८५ हजारांहून अधिक मतांनी ते निवडून आले.
● लातूर- डॉ. शिवाजी काळगे
● नांदेड- वसंत चव्हाण
● जालना- कल्याण काळे
२०१९ मधील स्थिती
● एकूण जागा – ८
● महायुती – सात भाजप – ४
● शिवसेना – ३
● एमआयएम – एक
लातूर, जालना, बीड, नांदेड या चार जागांवर भाजपचे वर्चस्व होते. धाराशिव, परभणी आणि हिंगोली येथे शिवसेनेचे खासदार होते ते भाजपबरोबर युतीमध्ये होते.
आठ मतदारसंघापैकी फक्त एक औरंगाबादच्या जागेवर एमआयएमचा विजय झाला होता. मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसला आहे.
२०२४ मधील स्थिती
● शिवसेना शिंदे गट : १
● शिवसेना उद्धव ठाकरे : ३
● काँग्रेस : ३
● राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट : १
भाजपच्या व्यवस्थापनाचेही गुण अधिक
मंत्री अतुल सावे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी निवडणुकीपूर्वी मतदार केंद्रनिहाय नियोजन केले होते. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. भाजप-शिवसेना युतीच्या आमदारांनी ताकद उभी करताना नीट ‘व्यवस्थापन’ केल्यामुळे संदिपान भुमरे यांना यश मिळाल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत.