छत्रपती संभाजीनगर : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या काेठडीतील मृत्यू प्रकरणात दाखल याचिकेत शुक्रवारी (ता. १२) सुनावणी झाली. कोठडीतील मृत्यू प्रकरणी दिशादर्शक चौकट निश्चित करण्याच्या संदर्भात मुख्य सचिवांनी ३ ऑक्टोबर पर्यंत स्पष्ट शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन एस. वेनेगावकर यांनी दिले आहे. याप्रकरणी ॲड.
प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाताई यांच्या वतीने बाजू मांडली. या संदर्भातील याचिकेनुसार सोमनाथ यांचा मृत्यू झाल्यानंतर १८ डिसेंबर २०२४ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. म्हणून याचिका दाखल करुन यातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा ही प्रमुख मागणी केली होती. बीएनएसएस (भारतीय न्याय संहिता) कायद्याच्या कलम १९६ नुसार न्यायालयीन कोठडीत एखाद्याचा मृत्यू झाल्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी (जेएमएफसी) त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची तरतूद या कलमात आहे. मात्र, त्यानंतरची पुढची पावले काय उचलावीत याबाबत कायद्यात कुठलेही निर्देश नाहीत. त्यामुळे पुढील कार्यवाही कशी व्हावी, यासंदर्भात कोर्टाने विचार करून नियमावली करावी, अशी विनंती करण्यात आली होती.
उच्च न्यायालयात वेळोवेळी सुनावणी झाली, मागच्या सुनावणीत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी (ता. बारा) झालेल्या सुनावणीत विजया सूर्यवंशी यांच्यातर्फे ॲड प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली, कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणात कायद्यात सुस्पष्टता असली पाहिजे असा युक्तीवाद केला. या पूर्वीच्या सुनावणीच्या अनुषंगाने शासनातर्फे शपथपत्र दाखल करण्यात आले होते, मात्र हे शपथपत्र स्पष्ट नसल्याने खंडपीठाने मुख्य सचिवांनी ३ ऑक्टोबर पर्यंत सुस्पष्ट शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना त्यांना ॲड मिलिंद संदानशिव यांनी सहकार्य केले. राज्य शासनाकडून मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली. पुढील सुनावणी १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.